संगीत, सन्मान आणि जल्लोष; ‘पुणे आयडॉल २०२६’ची दिमाखदार सांगता

बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमी नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

News Photo   2026 05 11T164443.919

सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित (Award) करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘पुणे आयडॉल २०२६’ या लोकप्रिय गायन स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमी नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

स्व.कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. गेल्या २४ वर्षांपासून सातत्याने आयोजित होत असलेल्या ‘पुणे आयडॉल’मुळे राज्यातील नवोदित व होतकरू गायकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून संगीत क्षेत्रात नवी प्रतिभा घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून केले जात आहे.

यंदाच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे वयाच्या अवघ्या ४ वर्षांपासून ते ८० वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग होय. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई आदी भागांतून तब्बल ५६० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. विविध वयोगटांतील स्पर्धकांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून उपस्थित रसिकांची मने जिंकली. या प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक सनी विनायक निम्हण, माजी नगरसेविका स्वाती निम्हण,नगरसेवक रवींद्र साळेगांवकर उपस्थित होते.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांनी ‘पुणे आयडॉल’च्या माध्यमातून पुण्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने एक सुंदर परंपरा सुरू केली. शहरातील दडलेले गायन कौशल्य समाजासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या स्पर्धेमुळे घडत आहे. ही परंपरा सनी विनायक निम्हण अत्यंत प्रामाणिकपणे आणि भावनिक बांधिलकी जपत पुढे नेत असल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताचे उपक्रम राबवून लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारे कार्य ते करत असल्याचे सांगत, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसंच, यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकत कार्यक्रमात विशेष रंगत निर्माण केली. कार्यक्रमादरम्यान मायरा सनी निम्हण हिने सादर केलेल्या प्रभावी तबलावादनाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली.

समाजकारण, प्रशासन, वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असतानाच संगीताची आवड जोपासणाऱ्या मान्यवरांना यावेळी ‘व्हॉईस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, नगरसेविका सपना आनंद छाजेड तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांचा समावेश होता.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर नवल किशोर राम यांनी ‘इक हसीन शाम को दिल मेरा खो गया’ हे गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच श्रोत्यांच्या आग्रहास्तव त्यांनी मन्ना डे यांचे लोकप्रिय गीत सादर केले. डॉ. जगदीश हिरेमठ यांनी भावस्पर्शी कवितेचे सादरीकरण केले, तर प्रशांत भस्मे यांनी ‘ओंकार स्वरूपा’ आणि ‘जीवा शिवाची बैलजोडी’ ही गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. सपना आनंद छाजेड यांनीही प्रभावी गायन सादर केले.

यावेळी बोलताना सनी विनायक निम्हण यांनी संगीत ही समाजाला सकारात्मक ऊर्जा देणारी आणि मानवी भावविश्व समृद्ध करणारी कला असल्याचे सांगितले. ‘पुणे आयडॉल’मुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील हौशी गायकांच्या आत्मविश्वासात वाढ होत असून त्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्पर्धेतील चारही गटांतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र, तर उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धकांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून जितेंद्र भुरूक, मंजुश्री ओक तसेच राजेश दातार यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. समारोप प्रसंगी प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरूक यांचा ‘गीतों का सफर’ हा विशेष संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी आणि ऋतूजा शिरोडे यांनी प्रभावीपणे केले.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे

लिटील चॅम्प्स गट :

* परी तेलंग — विजेती
* श्रेयस अडागळे — रनरअप
* देवांश भाटे — द्वितीय रनरअप
* आरंभी रीठे — उत्तेजनार्थ

युवा आयडॉल गट :

* निषाद मरोडकर — विजेता
* अमेय तारणेकर — रनरअप
* मुक्ता निवळकर — द्वितीय रनरअप

जनरल आयडॉल गट :

* अमृता मोडक — विजेती
* स्वाती भोसले — रनरअप
* गोविंद कांबळे — द्वितीय रनरअप

ओल्ड इज गोल्ड गट :

* अरविंद देशपांडे — विजेते
* कैलास गोरेल — रनरअप
* रोशन शेख — द्वितीय रनरअप

follow us