क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; अवघ्या 5 दिवसांत 2,700 कोटींची कमाई
अवघ्या पाच दिवसांतच चित्रपटाने जागतिक स्तरावर 264 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक, म्हणजेच सुमारे 2,700 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
‘The Odyssey’ hits the box office : हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांच्या बहुप्रतिक्षित ‘द ओडिसी’ या चित्रपटाने प्रदर्शित होताच जगभरातील बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धडाका घातला आहे. भव्य निर्मिती, नेत्रदीपक दृश्यरचना, दमदार कथानक आणि नोलन यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शनाच्या जोरावर या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अवघ्या पाच दिवसांतच चित्रपटाने जागतिक स्तरावर 264 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक, म्हणजेच सुमारे 2,700 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या दमदार कामगिरीमुळे ‘द ओडिसी’ हा क्रिस्टोफर नोलन यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी जागतिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे, याआधी ‘ओपेनहायमर’ आणि ‘द डार्क नाईट रायझेस’ यांनी प्रस्थापित केलेले विक्रमही या चित्रपटाने मागे टाकले आहेत.
भारतीय बॉक्स ऑफिसवरही ‘द ओडिसी’ची जोरदार घोडदौड सुरू आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 17 कोटी 40 लाख रुपयांची कमाई करत दमदार सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 22 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 21 कोटी 90 लाख रुपये, चौथ्या दिवशी 8 कोटी रुपये आणि पाचव्या दिवशी 8 कोटी 35 लाख रुपयांची कमाई केली. यामुळे भारतातील चित्रपटाची पाच दिवसांची एकूण निव्वळ कमाई तब्बल 77 कोटी 65 लाख रुपयांवर पोहोचली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कामकाजाचे दिवस असूनही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड कायम ठेवली आहे.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारे मैदानात; उद्या अहिल्यानगरात मौन आणि धरणे आंदोलन
‘द ओडिसी’ला भारतात केवळ इंग्रजी भाषेतच नव्हे, तर हिंदी, तमिळ आणि तेलुगू आवृत्त्यांनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. मल्टिप्लेक्ससह अनेक प्रमुख चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः नोलन यांच्या चित्रपटांचे चाहते, भव्य सिनेमॅटिक अनुभव पसंत करणारे प्रेक्षक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे वळत आहेत.
जागतिक स्तरावर मिळालेल्या विक्रमी सुरुवातीमुळे ‘द ओडिसी’ आता 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या शर्यतीत आघाडीवर पोहोचला आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग आणि प्रेक्षकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी अनेक विक्रम आपल्या नावावर करू शकतो, असा अंदाज चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर जागतिक चित्रपटसृष्टीतही आपले वर्चस्व सिद्ध करण्यास सुरुवात केली असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.