‘स्वप्न प्रशासनाची अन् ध्यास निसर्ग रक्षणाचा; ‘आउट ऑफ सिलॅबस’ च्या टीझरने वाढवली उत्सुकता
पुस्तकांच्या चौकटीबाहेर जाऊन समाज आणि पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे.
The teaser of ‘Out of Syllabus’ has increased curiosity : MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांच्या आयुष्यातील संघर्ष, स्वप्नं आणि निसर्गरक्षणाची जबाबदारी यांचा सुंदर संगम उलगडणाऱ्या ‘आऊट ऑफ सिलॅबस’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. पुस्तकांच्या चौकटीबाहेर जाऊन समाज आणि पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. याचबरोबर टिझरमधील बॅकग्राउंड म्युझिक त्यातील सीन अधिक प्रभावी करत आहेत.
‘पुस्तकांच्या पलीकडे…’ या टॅगलाईनला साजेसा असलेला टीझर तरुणाईच्या भावविश्वाला स्पर्श करतो. MPSC परीक्षेची स्वप्नं डोळ्यांत साठवून स्पर्धा परीक्षेच्या तयारीत मग्न असलेली काही तरुण मुलं, त्याचवेळी निसर्गसंवर्धनासाठी झटताना दिसतात. वैयक्तिक यशापेक्षा समाज आणि पर्यावरणाप्रती असलेली बांधिलकी किती महत्त्वाची आहे, याचा प्रभावी संदेश टीझरमधून देण्यात आला.
चित्रपटातील भावनिक क्षण, प्रेरणादायी संवाद आणि निसर्गाशी असलेले नाते यामुळे टीझरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आजच्या तरुण पिढीसमोरील वास्तव, स्पर्धा परीक्षांचा ताण आणि पर्यावरण संवर्धनाची गरज या विषयांना संवेदनशीलतेने हाताळणारा हा चित्रपट मनोरंजनासोबतच विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे.
नमाज पठण नाही केले तर कुटुंब नरकात जाईल; चार्जशीटमधील आरोपांमुळे नाशिक TCS प्रकरण पुन्हा चर्चेत
या चित्रपटाची तांत्रिक बाजू अतिशय भक्कम असून चित्रपटाचे लेखन अनिकेत कोरडे यांनी केले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले आहे. निर्माते डॉ. सुगत जी. वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’च्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. तांत्रिक नाविन्य जपत सचिन मनोहराराव ढोकणे यांनी चित्रपटाचे ‘AI क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून काम पाहिले आहे. तर संगीत दिग्दर्शक मोहित कुलकर्णी यांनी संगीताची धुरा सांभाळली असून, वैशाली सामंत, अभय जोधपूरकर आणि गोपाळ गावंडे यांनी गाण्यांना सुमधुर स्वर दिले आहेत. तर मनीष केदार व्यास, सुधीर वड्डेली यांनी छायांकनाची जबाबदारी पेलवली आहे. आणि संकलन अनिल विठ्ठल थोरात यांचे आहे.
मुख्य भूमिकेत अजिंक्य राऊत, अद्वयी आणि शेषपाल गणवीर असून त्यांना सानिका तोरस्कर, अभिजित रामचंद्र, मिलिंद शिंदे आणि कमलेश सावंत यांची महत्त्वपूर्ण साथ लाभली आहे. ‘अदू-तिशू प्रॉडक्शन अँड म्युझिक’ प्रस्तुत ‘आउट ऑफ सिलॅबस’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावरही त्याची चर्चा रंगू लागली असून चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे. ‘आऊट ऑफ सिलॅबस’ हा चित्रपट तरुणांना प्रेरणा देणारा आणि समाजाला सकारात्मक दिशा दाखवणारा अनुभव ठरेल, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.