धमाल बोक्याला मिळणार कमाल आजी! ‘बोक्या सातबंडे 2.0’ मध्ये वनिता खरातची एन्ट्री

‘बोक्या सातबंडे 2.0’ भेटीला येत आहे. या नव्या सादरीकरणाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री वनिता खरात यांची दमदार एंट्री.

  • Written By: Published:
Untitled Design (38)

Vanita Kharat’s entry in ‘Bokya Saatbande 2.0’ : लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचा लाडका ठरलेला ‘बोक्या सातबंडे’ पुन्हा एकदा रंगभूमीवर धमाकेदार पुनरागमन करत आहे. यावेळी मात्र हे नाटक अधिक आकर्षक आणि अद्ययावत स्वरूपात ‘बोक्या सातबंडे 2.0’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या सादरीकरणाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री वनिता खरात यांची दमदार एंट्री. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेल्या वनिता आता या नाटकात बोक्याच्या ‘नटखट आजी’ च्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या येण्यामुळे नाटकात विनोद आणि भावनांची रंगत आणखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

या नाटकात खोडकर बोक्याची भूमिका आरुष बेडेकर साकारत असून, त्याला साथ देणारी वनिताची कमाल आजी ही जोडी प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. तर बोक्याच्या वडिलांची भूमिका अनुभवी अभिनेता प्रणव जोशी साकारत आहेत. दरम्यान, या नाटकाने आधीच यशाचा टप्पा गाठला आहे. आतापर्यंत 75 हून अधिक प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, महाराष्ट्रासह बंगळुरू आणि मध्य प्रदेशातही या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आता या नाटकाचं चौथं सेशन सुरू होत असून, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी खास मर्यादित प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.

मोठी बातमी! महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना विधेयकावर मतदान, बहुमत नसल्याने नामंजूर

या नाटकामागेही एक मजबूत टीम कार्यरत आहे. कथा लेखन डॉ. निलेश माने यांचं असून, दिग्दर्शनाची जबाबदारी विक्रम पाटील आणि दीप्ती जोशी यांनी सांभाळली आहे. संगीत निनाद म्हैसळकर, नेपथ्य संदेश बेंद्रे, वेशभूषा महेश शेरला, प्रकाशयोजना राहुल जोगळेकर, तर नृत्य दिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केलं आहे.

दरम्यान, या नाटकाचे आगामी प्रयोग पुढीलप्रमाणे होणार आहेत –
22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता गडकरी रंगायतन, ठाणे,
23 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता दिनानाथ नाट्यगृह, पार्ले,
आणि 25 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे प्रयोग सादर होणार आहेत.

एकूणच, खोडकर बोक्या आणि त्याची नटखट आजी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे रंगभूमीवरील या धमाल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांनी सज्ज व्हावं, असं आवाहन करण्यात येत आहे.

follow us