आफ्रिका प्रत्यक्षात ग्रीनलँडपेक्षा 14 पट मोठा! जगाचा ‘चुकीचा’ नकाशा बदलण्यासाठी मोठा निर्णय, अमेरिका विरोधात
टोगोच्या पुढाकाराने आणि आफ्रिकन युनियनसह विविध संस्थांच्या पाठिंब्याने राबवण्यात आलेल्या करेक्ट द मॅप मोहिमेला यामुळे मोठं यश मिळालं आहे.
A major decision to change the world’s ‘incorrect’ map : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने आफ्रिका खंडाचा वास्तविक आकार अधिक अचूकपणे दर्शवणाऱ्या नकाशाला प्रोत्साहन देणारा महत्त्वाचा ठराव मंजूर केला आहे. टोगोच्या पुढाकाराने आणि आफ्रिकन युनियनसह विविध संस्थांच्या पाठिंब्याने राबवण्यात आलेल्या करेक्ट द मॅप मोहिमेला यामुळे मोठं यश मिळालं आहे. या ठरावाच्या बाजूने 164 देशांनी मतदान केलं, तर अमेरिकेने एकट्याने विरोधात मतदान केलं. सर्बिया, एस्टोनिया, जॉर्जिया, लिथुआनिया, मोल्दोव्हा आणि युक्रेन हे सहा देश मतदानापासून दूर राहिले.
जगभरात अनेक वर्षांपासून वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक मार्केटर प्रोजेक्शन ऐवजी इक्वल अर्त प्रोजेक्शनसारख्या अधिक अचूक प्रमाण दर्शवणाऱ्या नकाशांचा वापर वाढवावा, अशी या मोहिमेची भूमिका आहे. मात्र UNGAच्या ठरावामुळे मार्केटर प्रोजेक्शनवर बंदी घालण्यात आलेली नाही किंवा इक्वल अर्त प्रोजेक्शनचा वापर बंधनकारक करण्यात आलेला नाही. सरकार आणि विविध संस्थांनी अधिक अचूक नकाशांचा वापर करण्याचा विचार करावा, एवढीच ठरावातून शिफारस करण्यात आली आहे.
16व्या शतकात फ्लेमिश नकाशाकार गेरार्डस मार्केटर यांनी समुद्री प्रवासासाठी मार्केटर प्रोजेक्शन विकसित केलं होतं. या नकाशात ध्रुवीय प्रदेशांजवळील भूभाग प्रत्यक्षापेक्षा मोठा दिसतो, तर विषुववृत्ताजवळील आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यांसारख्या खंडांचा आकार तुलनेने लहान भासतो. याचं सर्वात मोठं उदाहरण आफ्रिका आणि ग्रीनलँडचं आहे. मार्केटर नकाशावर ग्रीनलँडचा आकार आफ्रिकेच्या जवळपास असल्याचा भास होतो. प्रत्यक्षात मात्र आफ्रिका ग्रीनलँडपेक्षा सुमारे 14 पट मोठा आहे. त्याचप्रमाणे मार्केटर नकाशात अलास्का आणि ब्राझील जवळपास समान आकाराचे दिसतात.
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात झिरवळांचे ओएसडी संशयाच्या भोवऱ्यात; गणेश देवरेंनी केला मोठा खुलासा
प्रत्यक्षात अलास्काचं क्षेत्रफळ सुमारे 17 लाख चौरस किलोमीटर, तर ब्राझीलचं सुमारे 85 लाख चौरस किलोमीटर आहे. म्हणजेच ब्राझील अलास्कापेक्षा जवळपास पाचपट मोठा आहे. 2018 मध्ये सादर करण्यात आलेल्या इक्वल अर्त प्रोजेक्शनमध्ये पृथ्वीच्या वक्रतेचा विचार करून खंडांच्या क्षेत्रफळातील परस्पर प्रमाण अधिक वास्तववादी पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या नकाशात आफ्रिका आणि ब्राझील अधिक मोठे, तर ग्रीनलँड आणि युरोप तुलनेने लहान दिसतात.
“नकाशे जगाबद्दलची आपली समज घडवतात. ते शिक्षणाला दिशा देतात, कल्पनाशक्तीला आकार देतात आणि सामूहिक धारणांवर प्रभाव टाकतात,” अशी भूमिका टोगोचे परराष्ट्रमंत्री रॉबर्ट डसी यांनी मतदानापूर्वी मांडली. आफ्रिका नो फिल्टर या मोहिमेशी संबंधित संस्थेनेही या निर्णयाचं स्वागत करत शाळा, पाठ्यपुस्तकं, न्यूज रूम, व्यवसाय आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर अधिक अचूक नकाशांचा वापर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
भारताने ठरावाला पाठिंबा का दिला?
संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी मिशनचे प्रथम सचिव रघू पुरी यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. इक्वल एरिया प्रकारातील नकाशांमुळे विविध खंड आणि भूभागांच्या क्षेत्रफळातील वास्तविक परस्पर प्रमाण टिकवून ठेवता येतं. त्यामुळे विशिष्ट भौगोलिक वैशिष्ट्यं जपण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नकाशांमुळे भूभागांच्या आकाराबाबत निर्माण होणारी चुकीची धारणा कमी होऊ शकते, असं भारताने म्हटलं आहे.
फडणवीस-शिंदेंच्या श्रेयवादात मराठा आरक्षण रखडलं; जरांगे पाटलांनी मोठा इशारा देत उपचार केले बंद
मात्र प्रत्येक कामासाठी एकच प्रकारचा नकाशा योग्य ठरत नाही, याकडेही भारताने लक्ष वेधलं. आकार, दिशा, अंतर किंवा क्षेत्रफळ यापैकी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आहे, यानुसार वेगवेगळ्या नकाशा पद्धती उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे हा ठराव तंत्रज्ञान आणि पद्धतीच्या बाबतीत तटस्थ असावा, अशी भारताची भूमिका आहे. अचूक नकाशांना प्रोत्साहन देतानाच देश, संस्था आणि नकाशाकारांना त्यांच्या गरजेनुसार योग्य प्रोजेक्शन निवडण्याचं स्वातंत्र्य असावं, असं भारताने स्पष्ट केलं.
विशेषतः खंडांच्या वास्तविक क्षेत्रफळाचं परस्पर प्रमाण दाखवण्याचा उद्देश असेल, तेव्हा इक्वल एरिया पद्धतीला प्रोत्साहन देण्याच्या तत्त्वापुरता भारताचा पाठिंबा असल्याचंही रघू पुरी यांनी नमूद केलं.