Iran Shocker : इराणमध्ये शेकडो मुलींना देण्यात आले विष, धक्कादायक कारण आले समोर
इराण : इराणमध्ये (Iran) एक धक्कादायक घटना समोर आली. मुलींना शाळेत जाण्यापासून रोखण्याकरिता इथे शेकडो मुलींना विष पाजल्याची धक्कादायक घटना इराणमधील एका शहरात समोर आली. इराणच्या एका मंत्र्याने याबाबत मोठा खुलासा केला. मंत्री म्हणाले की कोम (Qom) या पवित्र शहराबरोबरच अनेक ठिकाणी मुलींच्या शाळा बंद करण्याकरिता काही लोकांनी शेकडो विद्यार्थिनींना विषबाधा करण्यात आली आहे. हे विष रासायनिक संयुगाच्या स्वरूपात देण्यात आले असून, अद्याप या प्रकरणात कोणाला देखील अटक करण्यात आली नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, कोम शहरातील शाळकरी मुलींच्या शरीरात विषबाधा झाल्याची पुष्टी झाली आहे, त्यापैकी अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. रविवारी इराणचे उप आरोग्य मंत्री युनूस पनाही (Minister Younes Panahi) यांनी या घटनेला दुजोरा दिला. मिळालेल्या माहितीनुसार कोममधील शाळेत अनेक विद्यार्थिनींना विषबाधा झाली होती. मंत्री पनाही यांनी या प्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणच्या ४ शहरांमधील १४ शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना लक्ष्य करण्यात आले आहे.
या प्रकरणात वायव्येकडील अर्देबिल शहर, राजधानी तेहरान, पश्चिमेकडील बोरोझार्ड शहर आणि कोम शहराचा समावेश आहे. कोम शहर हे इराणचे पवित्र शहर मानले जाते आणि ते अतिशय पुराणमतवादी आणि धार्मिकदृष्ट्या कट्टर शहर मानले जाते. देशात काही नेते आणि राष्ट्रपतींनी त्यांचे धार्मिक शिक्षण कोम शहरातून घेतले आहे.
मुलींना विषबाधा अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा इराणमध्ये नुकतेच हिजाबविरोधी हिंसक निदर्शने देशभरात पसरली आणि याला जगभरातून समर्थन मिळाले. २२ वर्षीय महसा अमिनी हिचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने निदर्शने उफाळून आली, ज्याला हिंसक वळण लागले. या निदर्शनांमध्ये सुरक्षा दलांनी ५०० पेक्षा जास्त लोक मारले, ४ आंदोलकांना फाशी देण्यात आली आणि हजारो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले.