Pakistan Crisis : पाकिस्तान की कंगालस्थान? चीनच्या कर्जात पाकिस्तान बुडाला, महागाई शिखरावर
पाकिस्तान आपला शेजारी देश, भारतासोबत स्वातंत्र झाला पण एकीकडे भारत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेची तयारी करत असताना पाकिस्तान मात्र कर्जात बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफचे बेलआउट पॅकेज मिळाले तरी ते पाकिस्तान या संकटातून पार पडेल, असं वाटत नाही.
सध्याची पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा विचार केला तर आजघडीला पाकिस्तानचे कर्ज देशाच्या संपूर्ण जीडीपीच्या 80 टक्के इतके झाले आहे. परकीय चलनाच्या साठ्यात फक्त 3 अब्ज डॉलर शिल्लक आहेत, ज्यातून पाकिस्तान फक्त पुढील तीन आठवड्यांचे आयत वस्तूचे बिल भरू शकतो. यानंतर पाकिस्तान इंधनासह गरजेच्या वस्तू आयात करू शकणार नाही.
हेही वाचा : Traffic Index : पुणे तिथे काय उणे, ट्रॅफिक जॅममध्येही मारला नंबर !
पाकिस्तानात किती महागाई आहे ?
सुरुवातीला आपण समजून घेऊ पाकिस्तानात महागाई किती आहे ? आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट नुसार पाकिस्तानमध्ये दैनंदिन वस्तूंची किंमत मोठया प्रमाणात वाढली आहे. आज पाकिस्तानच्या काही शहरात 10 किलोच्या पिठाच्या पिठाची किंमत 1250 इतकी झाली आहे. जी याआधी 800 रुपये इतकी होती. त्याचप्रमाणे आधी 380 रुपयांना मिळणारे खाद्यतेल आता 620 रुपये इतके झाले आहे. तर एक किलो हरभरा डाळ 280 रुपये होती ती आता 430 रुपये झाली आहे.
दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही प्रचंड वाढल्या आहेत. डिझेल 270 रुपये प्रति लीटर झाले आहे. त्यामुळे पाकिस्तान दिवाळखोर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तान दिवाळखोर झाला तर कंपन्या आणि कारखाने बंद होतील. आयातही बंद होईल. वाहतूक व्यवस्था ठप्प होईल. अन्नधान्यासोबत, दैनंदिन गरजेच्या वस्तू बाजारात मिळणं बंद होईल. परिणामी गुन्हेगारी वाढून हिंसाचार होईल. तसं आताही पाकिस्तानमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. सध्या त्याचे मित्र चीन, सैदी आणि इतर देशही पाकिस्तानला कर्ज द्यायला तयार नाहीत.
हेही वाचा : उद्धवजी धनुष्यबाण जाऊ द्या… जगनमोहन रेड्डी कडे बघा आणि लढा!
चीनच्या कर्जात पाकिस्तान बुडाला
पाकिस्तानवर सध्या 10 लाख कोटी रुपयांचे बाहेरील कर्ज आहे. सोबतच पाकिस्तानने IMF कडूनही 57 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. एकूण कर्जापैकी 30 टक्के कर्ज चीनकडून घेतले आहे.
दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया मोठ्या प्रमाणात घसरत आहे. आजघडीला पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 260 रुपयांवर घसरला आहे. म्हणजे एक अमेरिकी डॉलर म्हणजे 260 पाकिस्तानी रुपये. 2022 अखेरीस पाकिस्तानी रुपया 178 रुपये प्रति डॉलर अशा परिस्थितीमध्ये होता. याचाच परिणाम पाकिस्तानच्या आयातीवर देखील होत आहे. कारण रुपयाचे मूल्य घसरल्याने आयातीचे बिलही वाढत आहे.
त्यामुळे पाकिस्तानातील सामान्य जनता महागाईच्या संकटात सापडली आहे. महागाईमुळे पाकिस्तानमधील लोक दुसऱ्या देशात स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात आहेत. जे श्रीमंत लोक आहेत ते परदेशात जातील. जे गरीब आहेत ते एकतर अडचणीत येतील किंवा आसपासच्या देशांमध्ये गैरमार्गाने स्थलांतर करण्याचा प्रयत्न करू लागतील. याचा फटका आपल्या सारख्या शेजारी देशांना होऊ शकते.
दूतावास विकण्याची तयारी
2022 मध्ये पाकिस्तानकडे 16.7 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा होता. आज तो फक्त 3 अब्ज डॉलर इतका उरला आहे. त्यामुळे पैसा उभारण्यासाठी पाकिस्तान काहीही करायला तयार आहे. याचाच एक भाग म्हणून पाकिस्तान परदेशातील आपली संप्पती विकण्याचाही विचार करत आहे. वॉशिंग्टनमधील आपला दूतावासही विकून पैसा उभा करायचाही ते विचार करत असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मध्ये आली आहे.
दुसरीकडे कर्जासाठी आयएमएफच्या अटी मान्य करून पाकिस्तान सरकारने जनतेवर मोठा बोजा टाकला आहे. कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तानने डिझेल आणि पेट्रोलच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. देशातील सार्वजनिक कार्यक्रमावर नियंत्रण आणण्याचा देखील विचार त्यांनी केला आहे. विवाह, शॉपिंग मॉल्स आणि बाजार लवकर बंद करण्यास सांगितले आहे जेणेकरून इंधनाचा वापर कमी होईल.
पाकिस्तान की कंगालस्थान
जानेवारी महिन्यात पाकिस्तानचा महागाई दर 27 % इतका होता. मीडिया रिपोर्टनुसार तो गेल्या पाच दशकातला सर्वोच्च दर होता. पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ आणि खाण्यापिण्याच्या वस्तूची दरवाढ हे महागाई वाढण्यातील सर्वात मोठे कारण आहे.
मागच्या आठवड्यात पाकिस्ताच्या संरक्षण मंत्र्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियात आला होता. ज्यामध्ये ते पाकिस्तान दिवाळखोर झाल्याचं सांगत आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोटमध्ये एका कार्यक्रमात बोलताना हा दावा केला. “पाकिस्तान आधीच दिवाळखोर झाला असून आपण दिवाळखोर देशात जगत आहोत”