धक्कादायक, पिकनिकला जाणाऱ्या स्कूल बसला आग, 25 जणांचा होरपळून मृत्यू
Bangkok School Bus Fire : बँकॉकमधील (Bangkok) एका उपनगर परिसरात मंगळवारी विद्यार्थी आणि शिक्षकांना पिकनिकला घेऊन जाणाऱ्या बसला अचानक आग (Bangkok School Bus Fire) लागल्याने 25 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरु असल्याची माहिती थायलंडचे परिवहन मंत्री सूर्या यांनी दिली आहे.
माहितीनुसार, पिकनिकला जाणाऱ्या या बसमध्ये 44 जण होते मात्र मंगळवारी दुपारच्या सुमारास बसला आग लागली. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या एका बचाव कर्मचाऱ्याने मंत्री सूर्याला सांगितले की, आग कदाचित टायर फुटल्यानंतर लागली. तर दुसरीकडे एका बचाव कर्मचाऱ्याने सांगितले की, बचाव कार्य करणाऱ्या टीमला आतापर्यंत बसमध्ये 10 मृतदेह सापडले आहेत.
या प्रकरणात गृहमंत्री अनुतिन चरणविराकुल (Anutin Charanvirakul) म्हणाले की, आतापर्यंत मृतांच्या संख्येची पुष्टी करण्यात आलेली नाही मात्र या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच अपघात कसा झाला याबाबत चौकशी सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती माध्यमांशी बोलताना गृहमंत्री अनुतिन चरणविराकुल यांनी दिली.
A school bus in Thailand with about 44 students and teachers on board caught fire on the outskirts of Bangkok.💔#WorldNews
pic.twitter.com/yLKYVC6rfO— DISHA.✨ (@DISHASINGH81) October 1, 2024
तसेच या अपघातात मृतांचा आकडा वाढू शकतो अशी देखील शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर बसच्या आता जाण्यास बचाव कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
तर दुसरीकडे पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांनी सोशल मीडिया एक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. तसेच पीडित कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे अशी माहिती देखील त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये दिली आहे.
सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये बसला लागलेली आग किती भयंकर होती हे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये संपूर्ण बस आगीत जळून खाक झाल्याचे दिसून येत आहे. तर बसला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत असल्याचे देखील दिसून येत आहे.