सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

तब्बल सहा दशकं रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज शांत झाला. आशाताईंच्या जाण्यानं सूरही गहिवरलेत.

News Photo   2026 04 13T173724.835

सूरसम्राज्ञी आशा भोसले (Asha Bhosle) यांना आज सोमवार (दि. 13 एप्रिल)रोजी संपूर्ण देशानं साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. दशकानुदशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गज गायिका आशाताईंच्या पार्थिवावर मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल सहा दशकं रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज शांत झाला. आशाताईंच्या जाण्यानं सूरही गहिवरलेत. तर, शब्दही हिरमुसलेत. फक्त सिनेसृष्टीच नाहीतर, अख्खा देश शोकसागरात बुडाला आहे.

सिनेसृष्टीपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, अभिनेते राकेश रोशन, अभिनेत्री नीना गुप्ता, मंगलप्रभात लोढा आणि भय्याजी जोशी, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, राज्यपाल जिष्णू देव शर्मा, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे तसंच विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप

दशकानुदशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावार आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, लोअर परळमधील त्यांच्या निवासस्थानी आशाताई भोसले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं. यावेळी मुंबई पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्वाचे नेतेही उपस्थित होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 93 व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला.

भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखल जायचं. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली.

follow us