बीडमध्ये बस-कारची भीषण धडक; तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या पाच भाविकांचा मृत्यू
बीडच्या पंढरपूर–खामगाव पालखी महामार्गावर बस आणि कारच्या भीषण धडकेत तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला.
Beed Road Accident : बीड जिल्ह्यातील पंढरपूर–खामगाव पालखी महामार्गावर शिंदेवाडी फाट्याजवळ बस आणि कारची जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. माजलगाव येथून तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला, तर बसच्या समोरच्या भागाचेही मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील काही जण कारने तुळजापूरच्या दिशेने प्रवास करत होते. शिंदेवाडी फाट्याजवळ पोहोचताच कार आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, या घटनेनंतर शिंदेवाडी परिसरातील ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. फाट्याजवळ रस्त्यावर असलेल्या जंपमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या महामार्गावर गेल्या वर्षभरात झालेल्या विविध अपघातांमध्ये सुमारे ५० ते ७० जणांचा मृत्यू झाला आहे. वारंवार अपघात होत असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. रस्त्यावरील धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती करून अपघात रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच संबंधित रस्त्याच्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
या अपघातातील मृतांची नावे
ओमकार महादेव गिरी, वय २४ वर्षे.
गजानन महादेव नामदास, वय ३८ वर्षे.
माऊली गजानन नामदास, वय ११ वर्षे.
सोमनाथ बडे, वय २३ वर्षे.
अनिल आचार्य, वय ४० वर्षे.