पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात! पोलो कार-ट्रकच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

वोक्सवॅगन पोलो कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 23T124423.410

Horrific accident on the Pune-Ahilyanagar highway : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली परिसरातील कटकेवाडीजवळ मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली. वोक्सवॅगन पोलो कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की कारमधील तरुणांना गंभीर दुखापत झाली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कटकेवाडी परिसरात मध्यरात्री वोक्सवॅगन पोलो कार आणि ट्रक यांची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारमधील तरुण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने वाघोली येथील आय मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी ओमकार सूर्यवंशी, शंकर ढोळे आणि मयूर औटी या तिघांना मृत घोषित केले. तर अपघातात जखमी झालेले आशुतोष मरकड आणि प्रणय शिंदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही शुद्धीवर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एकाच अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मित्रपरिवारासह परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Raju Shetti : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकत्र का येत नाही? राजू शेट्टींचा कारखानदारांना तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाघोली आणि कटकेवाडी परिसरात भरधाव वाहनांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनांचा वेग आणि महामार्गावरील वाहतुकीची परिस्थिती यामुळे अपघातांचा धोका अधिक वाढत आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतुकीचे नियम पाळणे किती आवश्यक आहे, हे या दुर्घटनेतून अधोरेखित झाले आहे.

दरम्यान, या अपघाताची पोलिसांत नोंद करण्यात आली असून अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास वाघोली पोलीस करत आहेत. तसेच अपघातग्रस्त तरुण नेमके कुठून आले होते आणि त्यांचा प्रवास कुठे सुरू होता, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. या भीषण अपघातामुळे तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

follow us