सैराट’ फेम अरबाज शेखच्या एका व्हिडिओनंतर खळबळ; एफडीएची नोबल हॉस्पिटलवर तातडीची कारवाई

एफडीएच्या तपासणीत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्याचा दावा प्रशासनाने केला असून, संबंधित मेडिकल तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design 24

Immediate action against Noble Hospital : नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख त्याच्या सोशल मीडियावरील भावनिक व्हिडिओमुळे चर्चेत आहे. वडिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या उपचारादरम्यान सोलापूरमधील नोबल हॉस्पिटलमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांबाबत अरबाजने अश्रूंना वाट मोकळी करून गंभीर आरोप केले. या व्हिडिओनंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई सुरू केली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार विभागाचे पथक नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सोलापूरचे सहायक आयुक्त अरुण गोडसे यांच्या नेतृत्वाखालील रुग्णालय परिसराची पाहणी करण्यात आली. तपासादरम्यान हॉस्पिटल्सही संलग्न असलेल्या फातिमा फार्मसीची देखील तपासणी करण्यात आली. या तपासणीत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्याचा दावा प्रशासनाने केला असून, संबंधित मेडिकलधील औषध विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णालयांकडून रुग्णांना केवळ रुग्णालयातील अधिकृत मेडिकलमधूनच औषधे व वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला होता. अशा पार्श्वभूमीवर नोबल हॉस्पिटलबाबत आलेल्या तक्रारींमुळे या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्रात समान नागरी कायद्याची तयारी अंतिम टप्प्यात; मसुद्यासाठी सात सदस्यीय समिती नियुक्त

अरबाज शेखने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना बाहेरून औषधे आणण्याची परवानगी दिली जात नसल्याचा आरोप केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, रुग्णालय प्रशासनाने केवळ त्यांच्या मेडिकलमधूनच औषधे आणि इंजेक्शन्स खरेदी करण्याची सक्ती केली. त्यामुळे उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा त्याने केला आहे.

व्हिडिओमध्ये अरबाज म्हणतो, माझ्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला दहा हजार रुपयांचे डिपॉझिट भरायला सांगण्यात आले. त्यानंतर औषधांची यादी देण्यात आली. मी ती औषधे बाहेरून आणू शकतो का, असे विचारले असता मला स्पष्टपणे सांगण्यात आले की, औषधे आणि इंजेक्शन्स फक्त हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच घ्यावी लागतील. त्या औषधांचे बिल चाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त झाले. हीच औषधे बाहेरून घेतली असती तर जवळपास निम्म्या किमतीत मिळाली असती. माझ्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी मी काहीही करत होतो, पण हा अनुभव अत्यंत वेदनादायी होता. अखेर मला त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले. माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी मला मदत करा, असे आवाहनही त्याने केले.

अरबाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडूनही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर FDAने तातडीने तपास सुरू करत प्राथमिक कारवाई केली आहे. आता या तपासात पुढे आणखी कोणते निष्कर्ष समोर येतात आणि रुग्णालय प्रशासनावर पुढील कायदेशीर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us