मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला; हल्लेखोराकडं चाकू सापडला

टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांची साडी खेचल्याचा आणि संबंधित तरुणीजवळ चाकू आढळल्याचा दावा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 13T215740.195

Mamata Banerjee Alleged Attack : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी संबंधित एका घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. (TMC) कोलकात्यातील कालीघाट परिसरात दुर्गापूजेच्या मंडपाचं उद्घाटन करत असताना एका तरुणीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तरुणीने ममता बॅनर्जी यांची साडी खेचल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तिच्याजवळ चाकू आढळल्याचा दावा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

या कथित घटनेनंतर ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप पक्षाकडून केला जात आहे. माजी मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांच्याबाबतच असा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या घटनेबाबत समोर आलेली माहिती आणि तृणमूल काँग्रेसने केलेले दावे यांची स्वतंत्रपणे पुष्टी होणं आवश्यक आहे.

मतचोरी आणि एसआयआरवरून इंडिया आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्यासाठी मोठी घोषणा

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनाही विरोधाचा सामना करावा लागल्याच्या घटना घडल्या होत्या. दक्षिण 24 परगना परिसरात त्यांच्यावर अंडी फेकण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. सोनारपूरमध्ये काही लोकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली, तसेच त्यांच्यावर चप्पलफेक आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनांमुळे राज्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं चित्र निर्माण झालं.

तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनाही अशाच प्रकारांना सामोरं जावं लागल्याचा दावा करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर फोनवर बोलत असताना त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती. याशिवाय सप्टेंबर महिन्यात हुगळी जिल्ह्यातील उत्तरपाडा येथे ममता बॅनर्जी यांच्या रॅलीसाठी जात असताना काही लोकांनी त्यांची कार अडवली. यावेळी कारवर अंडी आणि दगड फेकण्यात आल्याने काच फुटल्याचं सांगण्यात आलं. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांशी संबंधित या घटनांमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण आणि नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

follow us