नीट आंदोलन पेटण्याची चिन्हे; अभिजीत दीपके म्हणाले, अटक झाली तर लढा अधिक तीव्र होईल
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असे जंतर मंतरवरील आंदोलकांना संबोधित करताना स्पष्ट केले.
Signs of the NEET protest intensifying : नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले असले, तरी आंदोलन थांबणार नसल्याचे स्पष्ट संकेत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असे त्यांनी जंतर मंतरवरील आंदोलकांना संबोधित करताना स्पष्ट केले. यावेळी अभिजित दीपके यांनी सरकारकडून आपल्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली. त्यांना नुकतीच अशी माहिती मिळाल्याचा दावा करत त्यांनी सरकारला इशारा देखील दिला.
आम्हाला अटक का करायची?
जंतर मंतरवर उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना दिपके म्हणाले, मला नुकतीच माहिती मिळाली आहे की, आज रात्री कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि आमच्या टीमला अटक केली जाऊ शकते. पण सरकारने आम्हाला अटक का करायची? आम्ही गेल्या 35 दिवसांपासून पूर्णपणे शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत आहोत. स्वतंत्र भारताच्या इतिहासात इतकं शांततापूर्ण आंदोलन क्वचितच झालं असेल. ते पुढे म्हणाले, आम्ही महात्मा गांधींच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि भारतीय संविधानाच्या मार्गावर विश्वास ठेवतो. मग संविधानाचा मार्ग स्वीकारणाऱ्या लोकांना अटक करण्याची गरज काय आहे? सरकारने अशी चूक करू नये.”
सोनम वांगचुक यांना हटवल्याने आंदोलन आणखी मोठे झाले
दिपके यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवण्याचा निर्णय सरकारसाठी उलटला. सरकारने सोनम वांगचुक यांना येथून हटवून मोठी चूक केली. त्याचा परिणाम असा झाला की आंदोलन आणखी मोठे झाले. त्यानंतर आंदोलकांवर झालेल्या कारवाईमुळे देशभरातील लोकांचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले, असे ते म्हणाले.
नीट पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारचा मोठा प्रहार; दोषींना 10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटींच्या दंडाची तरतूद
विद्यार्थ्यांवरील कारवाईनंतर आंदोलन देशभर पसरले
अभिजित दिपके यांनी आरोप केला की, आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर देशभरातून आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला. त्यांच्या मते, 20 जुलैच्या आंदोलनाची व्याप्ती वाढली आणि देशातील विविध राज्यांमध्ये या विषयावर चर्चा सुरू झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आता राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
अटक केल्यास आंदोलन आणखी तीव्र होईल
सरकारला थेट इशारा देताना दिपके म्हणाले, आम्हाला अटक करण्याची तिसरी चूक करू नका. जर आमच्या टीमला अटक करण्यात आली, तर हे आंदोलन आणखी मोठे होईल. देशभरातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होतील. यावेळी त्यांनी उपस्थित आंदोलकांना देखील आवाहन केले. जर आमच्या टीमला अटक झाली, तरी आंदोलन शांततापूर्ण मार्गाने पुढे सुरू ठेवा. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही देशभक्त आहात, संविधानावर विश्वास ठेवणारे नागरिक आहात. देशाचे नुकसान होईल असे कोणतेही पाऊल तुम्ही उचलणार नाही, असे ते म्हणाले.
आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे देशाचे लक्ष
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. मात्र अभिजित दिपके यांनी केलेल्या वक्तव्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू झालेले हे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकार आणि आंदोलक यांच्यातील संघर्ष पुढील काही दिवसांत कोणते वळण घेतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.