रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत मोबाइल-लॅपटॉप चार्जिंग बंद, रेल्वे बोर्डाचे कडक निर्देश
रेल्वेमधील मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगची विद्युत जोडणी बंद ठेवण्याच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत.
Strict directives from the Railway Board regarding the charging : रेल्वेतून रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आता रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत रेल्वेच्या डब्ब्यांमधील मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगची विद्युत जोडणी बंद ठेवण्याच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. आग लागल्याचा धोका टाळणे आणि प्रवाशांची सुरक्षा निश्चित करणे, हाया निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
रेल्वे बोर्डाने 2014 मधेच रात्रीच्या वेळी चार्जिंग पॉईंटची वीज बंद ठेवणायचा निर्णय घेतला होता. मात्र, अलीकडे दक्षिण पूर्व रेल्वे विभागात घडलेल्या एका घटनेनंतर या नियमाची अंमलबजावणी पुन्हा एकदा कठोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दक्षिण पूर्व रेल्वे विभागात एका प्रवाशाची पॉवर बँक चार्जिंगदरम्यान फुटली आणि त्यातून धूर निघाल्याची घटना घडली. संबंधित वेळेत डब्यातील चार्जिंगची विद्युत जोडणी बंद करण्यात आली नव्हती. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे बोर्डाने 26 ऑक्टोबर रोजी सर्व विभागांना पत्र पाठवून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगितलं.
महामार्गावर ओव्हरस्पीड चलनाबाबत मोठी बातमी! नितीन गडकरींचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश, वाहनचालकांना दिलासा
रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत चार्जिंगची विद्युत जोडणी बंद राहील, याची जबाबदारी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांवर असेल. कर्मचाऱ्यांना यासंदर्भात योग्य प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, वरिष्ठ अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी अचानक तपासण्या करून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खात्री करावी, असे देखी रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
रेल्वे बोर्डाने जून 2014 मध्ये पहिल्यांदा रात्रीच्या वेळी रेल्वे डब्यांमधील चार्जिंगची विद्युत जोडणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. 2013 मध्ये हजूर साहिब नांदेड-केएसआर बंगळुरू एक्स्प्रेसच्या वातानुकूलित तृतीय श्रेणीच्या डब्यात आग लागली होती. या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत चार्जिंग पॉइंटची वीज बंद ठेवण्याची शिफारस केली होती. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे बोर्डाने रात्री 11 ते पहाटे 5 ही वेळ निश्चित केली. आता या नियमाच्या अंमलबजावणीवर पुन्हा विशेष भर दिला जात आहे.
त्यामुळे रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोबाइल, लॅपटॉप आणि पॉवर बँक चार्ज करण्याचे नियोजन प्रवासाच्या वेळेनुसार करावे. सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेच्या नियमांचे पालन करणे आणि चार्जिंगदरम्यान उपकरणांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.