शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! ‘त्या’ 6 खासदारांच्या बंडावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सहा खासदारांच्या पक्षांतराला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सहा खासदारांच्या पक्षांतराचा मुद्दा आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यासह या सहा खासदारांविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सहा खासदारांच्या पक्षांतराला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान संबंधित खासदारांना नोटीस बजावण्यात आल्याने त्यांच्या पक्षांतराच्या वैधतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
काही दिवसांपूर्वीच या सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला होता. मात्र, आता त्याच निर्णयाला न्यायालयीन आव्हान मिळाल्याने शिंदे यांच्या शिवसेनेसमोरील कायदेशीर पेच वाढण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसमुळे या सहा खासदारांच्या पक्षांतरावर पुढील न्यायालयीन प्रक्रिया काय वळण घेते, याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे शिंदे गटातील या खासदारांच्या भूमिकेबाबत आणि पक्षांतराच्या भवितव्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.