घसरण अद्याप थांबलेली नाही; सोनं एक लाखांच्या खाली येणार?; मोठ्या बँकेच्या टार्गेटची चर्चा
Gold Price Forecast : सोन्याच्या दरातील घसरणीने गुंतवणूकदारांची चिंता वाढली असून, बँक ऑफ अमेरिकेच्या नव्या अंदाजाने बाजाराचं लक्ष वेधलं आहे.
Gold Prices : जागतिक बाजारात सोन्याच्या (Gold) किमतीत सातत्याने घसरण होत असून, सोन्याचा दर प्रति औंस 4150 डॉलरच्या खाली आला आहे. बँक ऑफ अमेरिकेच्या अंदाजानुसार, ही घसरण आणखी वाढल्यास सोन्याचा दर 3700 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली येऊ शकतो. भारतीय चलनात हा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.12 लाख रुपये असेल. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर आता बाजारात दर स्थिर होण्यासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता बँकेने व्यक्त केली आहे.
बँक ऑफ अमेरिकेच्या अहवालानुसार, जानेवारी 2026 मध्ये सोन्याने प्रति औंस 5595 डॉलरचा विक्रमी टप्पा गाठला होता. त्यानंतर किमतीत घसरण सुरू झाली असून, हा दीर्घकाळ चाललेल्या तेजीतील सुधारण्याचा टप्पा असल्याचं बँकेचं मत आहे. 16 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालातही सोन्याच्या किमतींना मागील तेजीच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी आणखी वेळ किंवा मोठ्या घसरणीची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. या घसरणीला सुमारे 38 आठवडे झाले असले, तरी मागील तेजीच्या तुलनेत हा कालावधी कमी असल्याने किमतींवरील दबाव कायम राहू शकतो.
दिवाळीत 31 टक्के कुटुंबं खरेदीच करणार नाहीत; सर्व्हेक्षणात ग्राहकांनी सांगितला मूड
बँकेच्या अंदाजानुसार, सोन्याचा दर 4697 डॉलरच्या वर जात नाही, तोपर्यंत घसरणीची शक्यता कायम राहील. याशिवाय 4472 डॉलरचा 50 आठवड्यांच्या सरासरी किमतीचा टप्पाही महत्त्वाचा मानला जात आहे. सोन्याचा दर 4000 डॉलरच्या खाली आल्यास टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याचा विचार करता येईल. 3700 डॉलरच्या आसपास खरेदी वाढवता येईल, तर 3500 ते 3250 डॉलरच्या दरम्यान उर्वरित गुंतवणुकीचा विचार करता येईल, असं बँकेच्या विश्लेषणात म्हटलं आहे. 3250 डॉलर हा सोन्यासाठी महत्त्वाचा आधारस्तर असून, भारतीय चलनात त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 98000 रुपये असेल. मात्र, हे अंदाज आहेत, निश्चित दर नव्हेत.
दरम्यान, डॉलरची वाढती ताकद सोन्याच्या किमतींसाठी अडचण ठरू शकते. डॉलर निर्देशांक 104.59 ते 105 पर्यंत जाण्याची शक्यता बँकेने व्यक्त केली आहे. हा निर्देशांक यापूर्वीच 102.86 च्या पुढे जाऊन 18 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. डॉलर मजबूत झाल्यास इतर चलनांतून सोने खरेदी करणाऱ्यांना ते महाग पडते आणि मागणीवर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, सोन्याचा दर यंदाच्या नीचांकी 3943 डॉलरच्या खाली गेला नाही आणि त्यानंतर महत्त्वाच्या सरासरी किमतीच्या टप्प्यांवर पोहोचला, तर दुहेरी तळाची रचना तयार होऊ शकते. अशा परिस्थितीत घसरणीचा टप्पा संपून 2027 मध्ये सोने नव्या विक्रमी स्तरावर जाण्याची शक्यता वाढू शकते.