Exclusive : कारखानदारी, राजकारणाची वाट सोडून मगरपट्ट्याचं साम्रज्य उभं करणारे सतीश मगर
Interview of Magarpatta City owner Satish Magar : पुण्यातील मगरपट्टा सिटी या आज लक्झरिअस एरिआ असलेला भाग एकेकाळी संपन्न अशी शेतजमीन होती. मात्र त्यातून ही टाऊनशिप कशी निर्माण झाली असा प्रश्न अनेकांना पडतो. पुणे शहर विकासाची योजना आली त्यावेळी येथेल शेतकरी आणि स्थानिकांनी या भागाच्या शहरीकरणाला विरोधही केला होता. मात्र त्याच मगरपट्ट्यातील सतीश मगर यांनी मगरपट्टा सिटी हे साम्राज्या उभं केलं आणि आपल्यासोबत इतर शेतकऱ्यांनाही उद्योजक बनवलं.
सतीश मगर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, मगरपट्टा या भागात मगर यांची वडिलोपार्जित शेती होती. मगर यांना घरातूनच अनेक गोष्टी वारसा म्हणून मिळालेल्या होत्या. कारण मगर यांचे काका आण्णासाहेब मगर यांचा साखर कारखाना होता, त्यांचे वडिलही या कारखान्यात डायरेक्टर होते, राजकारणात देखील त्यांचे वडीलधारे होते. सुरूवातीला त्यांना शेतकरी संघटनेतही काम केलं मात्र यापैकी कोणत्याही वाटेवर न जाता मगर यांनी मगरपट्ट्याचं साम्रज्य उभं केलं.
आपल्या याच आगळ्यावेगळ्या प्रवासाबद्दल सतीश मगर यांनी लेट्स अप मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उलगडा केला. यावेळी त्यांनी आपले अथक परिश्रम, खडतर प्रवास आणि मिळालेले यश त्याचबरोबर विविध विषयांवर त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली.
सतीश मगर यांना शेतकरी व्हायचं होत…
सतीश मगर सांगतात की, ‘आपल्याला शेतकरी व्हायचं होतं, त्यासाठी अॅग्रीकल्चरची पदवी घेऊन आपण ग्रॅज्युएट झालो. सुरुवातीला शेतीही केली. मात्र त्यादरम्यानच पुणे शहर विकासाची योजना आली. त्यामध्ये मगरपट्टा ज्या ठिकाणी आपलं शेती करण्याचे स्वप्न आहे. त्या भागाचे भविष्यात शहरीकरण होणार आहे. असं कळालं, त्यावेळी आपल्या वडीलधाऱ्यांनी हा भाग शेतीसाठीच राहावा यासाठी सरकारशी लढा दिला. त्या लढ्यामध्ये एक तरुण म्हणून मी त्यांना मदत केली. मात्र हे माहीत होतं की भविष्यात कधी ना कधी या भागाचे शहरीकरण होणार आहे.’ असं ते सांगतात.
कारखानदारी, राजकारणाची वाट सोडून मगरपट्ट्याचं साम्रज्य उभं केलं…
‘आमच्या भागातील अनेक लोक शेतकरी संघटनेची जोडलेले होते. त्याचवेळी माझी दोन-तीन वेळा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याशी भेट झाली. जोशी यांची भूमिका होते की, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर शेतीचं ग्लोबलायझेशन झालं पाहिजे. मात्र जोपर्यंत शेती करत होतो तोपर्यंतच मी शेतकरी संघटनेशी जोडलेलो होतो. दुसरीकडे माझे काका अण्णासाहेब मगर यांचा यशवंत साखर कारखाना होता. माझे वडील त्या कारखान्यावर डायरेक्टर देखील होते. मात्र काकांनी निर्माण केलेल्या कोणत्याही संस्थेत आपण शक्यतो जायचं नाही. असं ठरवलेलं होतं. त्याचबरोबर शहरीकरण वाढत असताना भवितव्याचा प्रश्न असल्याने मी राजकारणात जाणं देखील टाळलं.’
…म्हणून उभारलं मगरपट्टा सिटी
‘शेतकऱ्याची जमीन त्याचं अस्तित्व असतं आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मी राजकारणाचा विचार सोडला. भारतात अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. शेतीचे तुकडे असल्याने त्यांचा विकास होऊ शकत नाही. कारण यामध्ये तुम्हाला मोठे मोठे आधुनिक साधने वापरता येत नाहीत. त्यामुळे डोक्यात एक कल्पना आली की, या सर्व तुकडीकरण झालेल्या शेतीला एकत्रित आणलं सामुदायिक रित्या एखादी संकल्पना राबवली पाहिजे. आपण एकट्याने काही कमावण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन येऊन कमावणे जास्तीत जास्त फायद्याचे होऊ शकते. शेतकऱ्यांना उद्योजक बनवू शकतो. हा विचार मी केला त्याचबरोबर या प्रकल्पामध्ये को-ऑपरेटिव्ह कंपनी तयार करण्यात आली. कारण सहकारी तत्त्वावर प्रकल्प राबवला असता. त्यामध्ये अडथळे आणि राजकीय हस्तक्षेप वाढण्याची शक्यता जास्त असते. तसेच सामुदायिकरित्या निर्णय घेणे देखील अडचणीचे ठरते.’
‘हा प्रकल्प निर्माण करताना अनेक शेतकऱ्यांना जमीनी विकल्यास आपल्याला किती फायदा होईल? त्या तुलनेत ही जमीन आपण विकसित केली तर आपल्याला किती जास्तीत जास्त फायदा होईल? हे पटवून दिल.’
‘त्याचबरोबर शेतकऱ्याने एखादा व्यवसाय केल्यास लोकांकडून हे शेतकऱ्याने आपली शेतजमीन घेऊनच हा व्यवसाय उभारल्याचं ठपका ठेवला जातो. हीच सल सतीश मगर यांच्या मनाला बोचली होती. कारण पुणे आणि परिसरात गुंठामंत्री हा शब्द शेतकऱ्यांसाठी प्रचलित होता. त्यामुळे आपल्या सगळ्या गुंठ्यांचा एकत्रिकरण करून एक विकसित प्रकल्प निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी मगरपट्टा सिटीच्या रूपाने पाहिलं.’ असं यावेळी मगर यांनी सांगितलं.
लेट्सअप मराठीने ‘लेट्सअप बिझिनेस महाराजा’ हे मुलाखत सूत्र सुरू केले आहे. यामध्ये नामांकित उद्योगपती, उद्योजक बांधकाम व्यावसायिक यांच्या जीवनाविषयीची फिलॉसॉफी, त्यांचं व्यवसायातील यश, त्या मागचे कष्ट प्रयत्न आणि विशेष म्हणजे जी नवी पिढी अशा प्रकारच्या व्यवसायांमध्ये उतरू इच्छित आहे. त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या युक्त्या अशा सर्व गोष्टी या मुलाखत सत्रामध्ये जाणून घेतल्या जाणार आहेत. दरम्यान या मुलाखत सत्राची सुरुवात पुण्यातील मगरपट्टा सिटीचे संस्थापक सतीश मगर यांच्या मुलाखतीने करण्यात आली.