मोबाईल बघून तुमचीही मुलं बनतंय का पिकी ईटर? नेमका प्रकार काय?
Mobile Addiction In Child पालकांसाठी धोक्याची घंटा वाजवणाऱ्या या समस्येतून नेमकं बाहेर कसं पडायचं? हे सोप्या भाषेत समजून घेऊया.
आजकाल प्रत्येक घरात एकच चित्र पाहायला मिळतं ताटात जेवण आणि समोर मोबाईल. मुलं जेवत नाहीत म्हणून आई-बाबा त्यांच्या हातात फोन देतात आणि मुलंही स्क्रीनमध्ये हरवून कसंही करून जेवण संपवतात. वरवर पाहता हे सोपं वाटत असलं, तरी ही सवय मुलांच्या आरोग्यासाठी एक ‘स्लो पॉयझन’ ठरत आहे. जेवताना फोन बघण्याच्या या वाईट सवयीमुळे मुलं एकतर ‘अंडरवेट’ म्हणजेच कमी वजनाची होत आहेत किंवा ‘ओवरवेट’ म्हणजे लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. पालकांसाठी धोक्याची घंटा वाजवणाऱ्या या समस्येतून नेमकं बाहेर कसं पडायचं? हे सोप्या भाषेत समजून घेऊया.
स्क्रीन’ बघत जेवल्याने मुलांचं काय नुकसान होतंय?
आजकाल पालकांकडे वेळेची कमतरता आहे. मूल रडतंय किंवा जेवत नाहीये, मग काम लवकर उरकावं म्हणून अनेकदा फोन दाखवून जेवू घातलं जातं. यामुळे पालक तात्पुरते रिलॅक्स होतात, पण मुलांच्या आरोग्याचं मोठं नुकसान होत असल्याचे तज्ज्ञांचं मत आहे.
पौष्टिक अन्नाच्या कमतरतेमुळे अंडरवेटचा धोका
जेव्हा मुलं फोनमध्ये डोकं खुपसून जेवतात, तेव्हा त्यांचं लक्ष जेवणात नसतं, तर स्क्रीनवर असतं. ते फक्त यंत्रासारखं तोंड चालवत असतात. यामुळे शरीराला आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटामिन्स आणि फॅट्स योग्य प्रमाणात मिळत नाहीत. परिणामी, मुलांची शारीरिक वाढ खुंटते आणि ती ‘अंडरवेट’ होतात.
मुलं बनताय ‘पिकी ईटर’
मोबाईल पाहत जेवणाऱ्या मुलांना अन्नाची चव कळत नाही. पुढे जाऊन ही मुलं खूप नखरे करायला लागतात. पालेभाज्या किंवा पौष्टिक अन्न खायला ती नकार देतात आणि त्यांना फक्त त्यांच्या आवडीचंच म्हणजेच जंक फूड किंवा गोड हवं असतं. त्यासाठी 1 ते 3 वर्षांच्या लहान मुलांना फोन किंवा टीव्ही स्क्रीनपासून पूर्णपणे लांब ठेवणे गरजेचं आहे.
मुलांची फोनची सवय कशी सोडवायची?
मुलांची मोबाईल बघत बघत जेवणाची सवय मोडण्यासाठी मुलांना वेगळं जेवू घालण्याऐवजी, ज्या ताटात तुम्ही जेवत आहात, त्याच ताटात त्यालाही सोबत घेऊन जेवायला बसा. यामुळे मुलाला तुमचं ‘अटेंशन’ मिळतं आणि ते आनंदाने जेवतं. जे तुम्ही मुलाला भरवत आहात, ते आधी स्वतः आवडीने खा. आई-बाबांना आवडीने खाताना पाहून मुलंही ते अन्न खाण्यासाठी प्रोत्साहित होतात. जेवताना डायनिंग टेबल किंवा जेवणाच्या जागेवर टीव्ही, मोबाईल किंवा टॅबलेट पूर्णपणे बंद ठेवा. सुरुवातीला मुलं हट्ट करतील, पण हळूहळू त्यांना अन्नाची चव कळू लागेल. याशिवाय जेवताना मुलाशी गप्पा मारा. अन्नाचा रंग, चव याबद्दल बोला. जेणेकरून त्यांचं लक्ष अन्नावर राहील.
निसर्गाच्या किंवा मोबाईलच्या लहरीपणावर मुलांचं नियंत्रण नसलं, तरी त्यांना योग्य सवयी लावणं पालकांच्या हातात आहे. निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे आजच मुलांच्या हातातला फोन काढा आणि त्यांना सकस, पौष्टिक आहाराची चव चाखायला शिकवा जेणे करून भविष्यात त्याला आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.