शिस्तप्रिय माणसचं आयुष्यात यशस्वी का होतात? वाचा, माहिती नसलेलं गुपित!

Disciplined People Success Tips काही लोक कमी वेळात आपलं ध्येय गाठतात, तर काही जण वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

  • Ninad K
  • Written By: Published:
Disciplined People

Why Disciplined People Succeed In Life? : आयुष्यात मोठं व्हायचं, भरपूर पैसा कमवायचा, करिअरमध्ये प्रगती करायची किंवा स्वतःचं एखादं स्वप्न पूर्ण करायचं, असं प्रत्येकालाच वाटतं. पण काही लोक कमी वेळात आपलं ध्येय गाठतात, तर काही जण वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. यामागे फक्त बुद्धिमत्ता, नशीब किंवा संधीच कारणीभूत असतात का? तर नाही. स्वतःला शिस्त लावण्याची सवय हा यशाच्या प्रवासातला एक महत्त्वाचा भाग असतो.

शिस्तप्रिय माणसचं आयुष्यात यशस्वी का होतात?

शिस्तप्रिय माणसं म्हणजे सतत नियमांच्या चौकटीत राहणारी किंवा आयुष्यात मजा न करणारी माणसं नव्हेत. उलट, त्यांना आपला वेळ कुठे खर्च करायचा, कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या, याची जाणीव असते. मूड चांगला असो वा नसो काम करण्याची वेळ आली की, ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. हीच सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरते.

शिस्तप्रिय माणसं यशस्वी होण्यामागची 5 कारणं

1. काम पुढे ढकलण्याची सवय कमी असते : ‘आज नको, उद्या करू’ असं म्हणत अनेकदा आपण महत्त्वाची कामं पुढे ढकलतो. पण शिस्तप्रिय माणसं काम वेळेत पूर्ण करण्याला महत्त्व देतात. त्यामुळे कामाचा ढीग साचत नाही आणि शेवटच्या क्षणी होणारी धावपळही कमी होते.

2. वेळेची किंमत : दिवसात प्रत्येकाला 24 तासच मिळतात. फरक एवढाच असतो की, त्या वेळेचा वापर कोण कसा करतं. शिस्तप्रिय माणसं दिवसाचं नियोजन करतात, महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देतात आणि विनाकारण वेळ वाया जाणार नाही, याची काळजी घेतात.

3. मूडपेक्षा ध्येयाला महत्त्व : कधी काम करण्याची इच्छा नसते, कधी कंटाळा येतो, तर कधी मोबाईलवर वेळ घालवावासा वाटतो. अशा वेळीही आपलं ध्येय लक्षात ठेवून काम सुरू करणं म्हणजे खरी शिस्त. प्रत्येकवेळी प्रेरणा मिळण्याची वाट न पाहता कृती करत राहिल्यामुळे प्रगती होण्याची शक्यता वाढते.

4. छोट्या सवयींमधून मोठे बदल : रोज थोडा व्यायाम करणं, नियमित वाचन करणं, नवीन कौशल्य शिकणं किंवा कामाचा आढावा घेणं या छोट्या गोष्टी वाटू शकतात. पण त्या सातत्याने केल्या, तर कालांतराने त्याचा मोठा फायदा होतो. शिस्तप्रिय माणसं एका दिवसात चमत्कार घडवण्यापेक्षा रोज थोडी प्रगती करण्यावर भर देतात.

5. चुका झाल्या तरी पुन्हा सुरुवात करतात : शिस्तप्रिय माणसं कधीच चुका करत नाहीत, असं नाही. त्यांच्याकडूनही चुका होतात आणि कधी अपयशही येतं. मात्र, त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी त्यांच्यात असते. एखाद्या दिवशी नियोजन बिघडलं, तरी सगळंच सोडून देण्याऐवजी दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करतात.

स्वतःला शिस्त लावायची असेल तर काय कराल?

– दिवसातील महत्त्वाची तीन कामं ठरवा.
– मोबाईल आणि सोशल मीडियासाठी वेळेची मर्यादा ठेवा.
– मोठं ध्येय छोट्या टप्प्यांत विभागा.
– रोज थोडं काम करा; परिपूर्ण वेळेची वाट पाहू नका.
– एखाद्या दिवशी ठरल्याप्रमाणे काम झालं नाही, तरी स्वतःला दोष देत बसण्याऐवजी पुन्हा सुरुवात करा.

follow us