साईचरणी वर्षभरात 400 कोटींचे दान
अहमदनगर : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश विश्वाला देणाऱ्या शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरात देश-विदेशातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी कोट्यवधी साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येतात. ते श्रद्धेतून बाबांच्या झोळीत भरभरून दानही अर्पण करतात. यातच साईचरणी वर्षभरात तब्बल 400 कोटींचे दान प्राप्त झाले आहे.
मागील वर्षापेक्षा यंदाच्या दान रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. साईचरणी साई भक्तांनी भरभरून दान दिले आहे. साई बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांनी दिलेल्या दानात सोने, चांदीचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. एकूणच शिर्डी संस्थानाला मागील वर्षाच्या तुलनेत मोठी रक्कम प्राप्त झाल्याने साईदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.
शिर्डीमधील साईबाबा मंदिरात 2022 या वर्षात चारशे कोटीरुपयांचे दान प्राप्त झाले आहे. यामध्ये दक्षिणापेटीत 166 कोटी रुपयांचे सर्वाधिक दान प्राप्त झाले आहे. तर देणगी काउंटरवर 72 कोटी 26 लाखांचे दान प्राप्त झाले आहे.
यामध्ये विशेष म्हणजे डेबिट आणि क्रेडिटद्वारे 41 कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. ऑनलाईन देणगीतूनही 82 कोटी रुपये प्राप्त झाले आहे. चेक, डीडी, मनिऑर्डरद्वारे 20 कोटी प्राप्त झाले. सोने 25 किलो 578 ग्रॅम, चांदी 326 ग्रॅम दानाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.