Vishal Dhume : एसीपी विशाल ढुमेंना कारनामा भोवला! गृह विभागाकडून निलंबन…

Vishal Dhume : एसीपी विशाल ढुमेंना कारनामा भोवला! गृह विभागाकडून निलंबन…

औरंगाबाद : एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी औरंगाबाद गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे(vishaldhume) यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. विशाल ढुमे यांच्या निलंबनाबाबत राज्याच्या गृहविभागाकडून आदेश पारित करण्यात आला आहे. निलंबनाचा आदेश असेपर्यंत ढुमे यांना औरंगाबादमधील पोलिस मुख्यालय सोडून न जाण्याचे आदेश देण्यात आलेत.

जोपर्यंत निलंबनाचे आदेश अस्तित्वात असतील तोपर्यंत विशाल ढुमे यांना औरंगाबाद मुख्यालय पोलिस आयुक्तांच्या(PolicHeadquarter) पूर्व परवानगीनुसार सोडता येणार नसल्याचं गृह विभागाकडून देण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आलंय. 14 जानेवारीच्या रात्री हाटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या एका पती-पत्नीला लिफ्ट मागून गाडीत विनयभंग आणि पीडित महिलेच्या घराबाहेर धुमाकूळ घातल्याप्रकरणी एसीपी विशाल ढुमे यांच्याविरोधात औरंगाबाद सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नेमकं प्रकरण काय?
औरंगाबाद शहरातील पती आणि पत्नी हॉटेलमधून जेवण करुन घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा ढुमे यांनी घरी सोडण्यासाठी पीडित महिलेच्या पतीला विनंती केली. पतीने होकार आणि ढुमे यांना कारमधील मागच्या सिटवर बसवले. पती कार चालवत होते आणि पीडित महिला पुढे शेजारच्या सीटवर बसली होती. त्यावेळी ढुमे यांनी पीडित महिलेसोबत चालत्या गाडीत अश्लील चाळे केल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आलाय. यावेळी पीडित महिलेकडून ढुमे यांच्या अश्लील चाळ्यांचा प्रतिकार करण्यात आला.

त्यानंतर घरी आल्यानंतर पीडित महिला आणि तिची मुलगी घरात गेले असता घरातील वॉशरुममध्ये येण्यासाठी पीडित महिलेच्या पतीकडे ढुमे यांनी हट्ट केला. वॉशरुम वापरण्यासाठी पतीने नकार दिला मात्र, त्यांनी हट्ट सोडला नाही. अखेर पीडित महिला हे सर्व चित्र घराच्या गॅलरीमधून पाहत होती. त्यावेळी पीडित महिलेने सासूबाईंना खाली जाऊन पाहण्यास सांगितलं.

अखेर सासूबाईंनी मध्यस्थी करीत त्यांनी माझं वॉशरुम वापरण्यास ढुमे यांना सांगितलं. मात्र, मला पीडित महिलेच्या पतीचेच वॉशरुम वापरायचं असल्याचं ढुमे यांनी त्यांना सांगितलं. त्यांच्या या हट्टाला सासूबाई आणि पतींने विरोध केल्यानं त्यांनी घरासमोरचं त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांना बोलवल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने ढुमे यांनी तिथून नेण्यात आल्याचं पीडित महिलेनं आपल्या जबाबात म्हंटलंय.

घटना घडल्यानंतर औरंगाबदमधील अनेक नागरिकांकडून रोष व्यक्त आला आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विशाल ढुमे यांना गृह खात्याने निलंबित करण्याची मागणी केली होती. विशाल ढुमेंना निलंबित करा, अशी मागणी अनेक नागरिकांकडून करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ येत्या शुक्रवारी औरंगाबादेत बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर गृह विभागाकडून अखेर विशाल ढुमेंचं निलंबन करण्यात आलंय.

घटनेप्रकरणी विशाल ढुमेंविरोधात नागरिक आक्रमक झाले होते. खासदार जलील यांनी निलंबनाच्या मागणीचा जोर कायम ठेवल्यानंतर अखेर गृह विभागाला आदेश काढावे लागले आहेत. दरम्यान, राज्यातील अनेक भागांत विनयभंगासह अत्याचाराच्या घटना घडत असतात. या घटना घडल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांकडून पोलिस मदत करतील आणि आम्हांला न्याय देतील, अशी माफक अपेक्षा ठेवण्यात येते. आता सर्वसामान्य नागरिकांचे रक्षकच भक्षकच होत असल्याने नागरिकांनी मदत आणि न्यायाची अपेक्षा कोणाकडे करावी? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube