Balasaheb Thorat : धर्माचे, जातीचे नाव घेऊन भांडणे लावायचा, काही लोकांनी हाच उपाय शोधलाय
धर्माचे किंवा जातीचे नाव घेऊन भांडणे लावायचे. समाजात भेद निर्माण करणे व दहशत निर्माण करणे ही पद्धत चुकीची असून हे लोकशाहीला मान्य नाही, अशी टीका माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित बैठकीत थोरात यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा काँग्रेसचा विचार आहे. सध्या अहमदनगर शहरातील वातावरण काळजी वाटावे असे आहे. यात आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. काहीजणांनी सोपा उपाय शोधला आहे. धर्माचे किंवा जातीचे नाव घेऊन भांडणे लावायचे. समाजात भेद निर्माण करणे व दहशत निर्माण करणे ही पद्धत चुकीची असून हे लोकशाहीला मान्य नाही”
हेही वाचा : अजितदादांचा शब्द, ‘सभागृहात आवाज उठवणार’; शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे
यावेळी सध्या शेतीमालाला मिळणाऱ्या भावाबद्दल बोलताना थोरात म्हणाले की, “भाजीपाला मातीमोल झाला, कांदा मातीमोल झाला. सोयाबीन, कापसाची पण तीच परिस्थिती आहे. त्यात पुन्हा अवकाळी पाऊस आला, त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय? पण आतापर्यंतची परिस्थिती अशी आहे की जेव्हा शेतकरी अडचणीत येतो, तेव्हा सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहते. त्यामुळे सरकारने याही वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे.”
तर ती भाजपची चूक
राहुल गांधी यांनी परदेशात केलेल्या एका भाषणावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेस हा विचार आहे. राहुल गांधी काँग्रेसच्या विचाराने काम करत आहेत. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पायी तीन हजार ५६० किलोमीटरचा प्रवास केला. हे सोपे नाही. देशातील बेरोजगारी, महागाई या विषयांवर त्यांनी आवाज उठविला. भारतीय जनता पक्षाला राहुल गांधी माओवादी वाटत असतील तर ती त्यांची चूक आहे. राहुल गांधी त्यांच्या पद्धतीने चांगले काम करत आहेत. असं थोरात यांनी सांगितलं.