विधानसभेतील ‘बटेंगे तो कटेंगे’च्या नाऱ्याचा भाजपलाच विसर?; अकोटमध्ये ओवैसींच्या एमआयएमशी युती
BJP Alliance With MIM अकोट नगरपंचायतीमध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही, त्यामुळे पक्षाने एमआयएमला सोबत घेऊन 'अकोट विकास मंचा'ची स्थापना केली आहे.
BJP Alliance With MIM In Akot Nagar Panchayat : विधानसभेत ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देणाऱ्या भाजपने अकोटमध्ये थेट ‘एमआयएम’शी आघाडी केल्याने मोठं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या युतीमुळे विधानसभेतील नाऱ्याचा भाजपलाच विसर पडला आहे का? असा प्रश्न भाजप अन् एमआयएमच्या अकोटमधील आघाडीमुळे उपस्थित केला जात आहे. अकोट नगरपंचायतीमध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही, त्यामुळे पक्षाने एमआयएमला सोबत घेऊन ‘अकोट विकास मंचा’ची स्थापना केली आहे. तर, दुसरीकडे अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि अकोटमधील एमआयएमसोबतची कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नसून, ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाईचा थेट इशारा फडणवीसांनी दिला आहे.
एमआयएमला सोबत घेऊन ‘अकोट विकास मंचा’ची स्थापना
अकोट नगरपंचायतीमध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही, त्यामुळे पक्षाने एमआयएमला सोबत घेऊन ‘अकोट विकास मंचा’ची स्थापना केली आहे ज्यात भाजपनंतर सर्वाधिक 5 जागा जिंकणारा एमआयएम भाजपचा मित्रपक्ष झाला आहे. याशिवाय या आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष सहभागी झाला आहे. या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे काल (दि.6) करण्यात आली आहे. BJP Alliance With MIM In Akot Nagar Panchayat
सर्वांना पाळावा लागणार भाजपचा व्हिप
13 जानेवारीला होत असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करणार असून, यातील सर्व पक्षांना भारतीय जनता पक्षाच्या व्हिपचे पालन करणे बंधनकारक राहणार असून भाजप आमदार रवी ठाकूर हे या आघाडीचे गटनेते असणार आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या माया धुळे विजयी झाल्या आहेत. 13 जानेवारीला उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रित मतदान करणार आहे. अकोट नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवार फिरोजाबी सिकंदर राणा यांना भाजपच्या माया घुळे यांनी 5271 मतांनी पराभूत केले होते. अकोट नगरपालिकेत भाजपनंतर एमआयएमचे सर्वाधिक 5 नगरसेवक विजयी झाले आहेत.
अकोट नगरपालिकेतील पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 35
निकाल जाहीर : 33 (2 जागांची निवडणूक नंतर होणार)
पक्षीय बलाबल :
भाजप : 11
काँग्रेस : 06
शिंदेसेना : 01
उबाठा : 02
वंचित : 02
अजित पवार राष्ट्रवादी : 02
शरद पवार राष्ट्रवादी : 01
प्रहार : 03
एमआयएम : 05
भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या ‘अकोट विकास मंचा’चे पक्षीय बलाबल :
भाजप : 11
एमआयएम : 05
शिंदेसेना : 01
उबाठा : 02
अजित पवार राष्ट्रवादी : 02
शरद पवार राष्ट्रवादी : 01
प्रहार : 03
एकूण 25
युती करणाऱ्यांवर कारवाई होणार : देवेंद्र फडणवीस
अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम युती केली. तर अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाल्याने फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाल्याचे समोर आले आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि अकोटमधील एमआयएमसोबतची कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नसल्याचे फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच हे जरी स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल, असा थेट इशारा फडणवीसांनी दिला आहे.
