विधान परिषदेत परिचारकांना झटका; सोलापूरमधून भाजपकडून राजा राऊतांच्या नावावर शिक्कामोर्तब

माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव मागे पडले असून त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (14)

BJP approves Rajendra Raut’s name : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अखेर राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये सोलापूर मतदारसंघासाठी राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव मागे पडले असून त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी प्रशांत परिचारक आणि राजेंद्र राऊत यांच्यात चुरस असल्याचे मानले जात होते. तसेच भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजीभाऊ पवार यांचेही नाव चर्चेत होते. पक्षनिष्ठा आणि दीर्घकाळ केलेल्या कामाच्या आधारे अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र, पक्षाने अखेर राजेंद्र राऊत यांच्यावर विश्वास दाखवला.

विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर भाजपमध्ये उमेदवारीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर केंद्रीय नेतृत्वाने राजेंद्र राऊत यांच्या नावाची घोषणा करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी भाजपकडून 11 जणांना उमेदवारी जाहीर, वाचा संपूर्ण यादी

राजेंद्र राऊत यांची निवड ही त्यांच्या अलीकडील राजकीय कामगिरीचा गौरव मानली जात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले होते. तसेच बार्शी नगरपालिकेवरही भाजपचा झेंडा फडकवण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. या यशस्वी कामगिरीची दखल घेत पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्जासाठी आवश्यक तयारी आधीच पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी विविध शासकीय कार्यालयांकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. तसेच त्यांनी एकापेक्षा अधिक अर्ज संच घेतल्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबतची शक्यता आधीपासूनच बळावली होती.

आता सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत राजेंद्र राऊत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून या शक्तिप्रदर्शनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने राजाभाऊ राऊत यांच्यावर दाखवलेला विश्वास कितपत सार्थ ठरतो, हे आगामी निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.

follow us