विखे कुटुंबीय आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ‘हॉटलाईन’ निळवंडेच्या पाण्यामुळे पुन्हा चार्ज
अहमदनगर : नुकतचं बहुप्रतिक्षित निळवंडे धरणातून पाणी वाहिलं. म्हणजे काय झालं तर तब्बल 5 दशकांपासून काम सुरु असलेल्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते ही चाचणी झाली. पण “आता सध्या फक्त चाचणी झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते कालव्यांचे अधिकृत उद्घाटन होणार आहे” अशी माहिती भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. (BJP Radhakrishna Vikhe Patil and Sujay vikhe patil Connection with Prime minister Narendra Modi)
खासदार विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीमुळे लवकरच पंतप्रधान मोदी अहमदनगरच्या दौऱ्यावर येणार हे निश्चित मानले जात आहे. डिसेंबर 2022 मध्येच सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना शैक्षणिक संकूल, शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरण आणि निळवंडे धरणाच्या उद्धघाटनासाठी निमंत्रण दिले होते. त्यावर मोदी यांनीही निमंत्रण स्वीकारले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले होते. दरम्यान, विखे पाटील यांच्या या विधानानंतर भाजपमध्येच विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.
मोदींशी जवळीक धाकधुक वाढवणारी… :
ज्या सहजतेने विखे पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट मिळवली आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल, ते ही ऑगस्टमध्ये होईल हे मुहूर्तासहित सांगितले, त्यामुळे राज्य भाजपमध्ये सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आधी राधाकृष्ण विखे पाटील यांची आणि दिल्लीतील भाजपच्या नेत्यांचे जवळचे संबंध असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. पण आता सुजय विखे पाटीलही मोदींच्या जवळ जात असल्याचे वरील विधानावरुन दिसून येत आहे. त्यांची ही जवळीक राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये धाकधुक वाढवणारी ठरताना दिसत आहे.
राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रातील नेत्यांचे थेट संबंध :
वास्तविक विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने एक तक्रार केली जाते की दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी वेळच मिळत नाही. विरोधी पक्षातील नेत्यांचा हा सुर असताना भाजपमधील जुन्याजाणत्या आणि वरिष्ठ नेत्यांनाही काहीसा असाच अनुभव येतो. पण 4 वर्षांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबतीत मात्र हा अनुभव काहीसा वेगळा आहे. मागील 4 वर्षांच्या काळात अनेकदा विखे पाटील आणि दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या यात मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत.
सप्टेंबर 2021 मध्ये तर राधाकृष्ण विखे पाटील यांना महिन्याभरात पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची दोन वेळा वेळ मिळाली होती. यात एकदा ते सहकुटुंब भेटले होते तर एकदा शिर्डी आयटी पार्कच्या कामासंदर्भात भेट झाली असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कोरोनामध्ये पंतप्रधान मोदींचा दौरा शक्य नव्हता तर ऑनलाईन स्वरुपात विखे पाटील यांनी त्यांची वेळ मिळवली होती. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मोदी यांच्या हस्ते झालं होते. एकदा तर गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीची वेळ तेव्हाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मिळू शकली नव्हती. पण विखे पाटील यांना मिळाली होती. यामुळे विखे पाटील यांचे आणि केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे थेट संपर्क असल्याचे बोलले जाते.
सुजय विखे पाटीलही वडिलांच्या पावलावर :
जी गोष्ट राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबाबतीत तेच गोष्ट आता त्यांच्या सुपुत्र आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्याबाबतीत होताना दिसत आहे. सुजय विखे पाटील आणि पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शाह यांच्या भेटीचेही फोटो अनेकदा व्हायरल झालेले आहेत. विखे पाटील यांना दिल्लीतील भाजपमध्ये मिळणाऱ्या या ‘स्पेशल ट्रिटमेंट’ची राज्यातील भाजपमध्ये मात्र दबक्या आवाजात वेगळीच चर्चा चालू असते. विखे-पाटील यांना भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांची भेट मिळत असल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ राज्य भाजपच्या राजकारणात काढले जातात.
मिळालेल्या मंत्रिपदावरुनही झाली होती जोरदार चर्चा :
गतवर्षी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरही विखे-पाटील यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. शिंदेंच्या मंत्रिमंडळात विखे-पाटील यांचा समावेश होणार हे निश्चित होते. पण त्यांच्याकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनंतर महत्त्वाचे मानले जाणारे महसूल खाते देण्यात येईल असा कोणालाच कयास बांधता आला नव्हता. वास्तविक महसूल खात्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा होती. फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांतदादांनी महसूल खाते भूषविले होते. पण बदलत्या समीकरणात विखे-पाटील यांना महत्त्व देण्यात आले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.