राज्यसेवा मुख्य परीक्षेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ‘ही’ मागणी
मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तूनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.
या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय लोकसेवा आयोगाने पुढे ढकलावा, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्राद्वारे केलीय. मुख्यमंत्री शिंदे पत्रात म्हणाले, राज्यसेवा मुख्य परीक्षा ही वस्तूनिष्ठ पर्यायांवर आधारित घेतली जाते. या पद्धतीमध्ये बदल करुन जुन्या पद्धतीने म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
हा निर्णय २०२३ पासून लागू केल्यास या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून त्यामुळे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षेचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलण्याची आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य करुन वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा निर्णय पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन राज्यातील लाखो तरुण-तरुणींना दिलासा मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अत्यंत कार्यक्षमतेने काम करीत असून गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये आयोगाने नोकऱ्यांमधील अनूशेष कमी करण्याचे काम वेगाने केले आहे. शासकीय नोकऱ्यांमधील ७५ हजार रिक्त पदे भरण्याची तयारी पूर्ण झाली असून त्याचे नियोजनही झालेले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.