नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव

शिकमध्ये मतदान केंद्राबाहेर गोकुळ गीते समर्थकांचा जल्लोष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे इथून अधिकृत उमेदवार होते.

  • Written By: Published:
Untitled Design 34

Defeat of Mahayuti candidate Narendra Darade : नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला असून अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी असताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गीते समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. निकालाच्या दिवशी अखेरपर्यंत रंगलेल्या राजकीय थरारानंतर नाशिकमध्ये गेम फिरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पहिल्या फेरीतील मतमोजणीत गोकुळ गीते यांना 357 मते मिळाली, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना 248 मते मिळाली. मतमोजणीदरम्यान 13 मते अवैध ठरल्याने विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत हा कोटा पार केल्याने दुसऱ्या फेरीची गरज भासली नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार अंतिम मतसंख्या 389 पर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

निकालानंतर गोकुळ गीते समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जल्लोष करत घोषणाबाजी केली. हमसे जो टकरायेगा वो मिट्टी में मिल जायेगा अशा घोषणा देत समर्थकांनी विजयाचा आनंद साजरा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत नाशिकची जागा महायुतीच्या वाटपात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे होती. त्यामुळे शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे अधिकृत उमेदवार होते. मात्र, या जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाल्याने महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

विधान परिषद निवडणुकांचा आज फैसला; महायुतीचं वर्चस्व कायम राहणार की विरोधक देणार धक्का?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले होते. त्यानंतर शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दोन्ही गीते बंधूंची समजूत काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. उदय सामंत स्वतः दोन ते तीन वेळा नाशिकला जाऊन गोकुळ गीते यांची भेट घेतली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्याशी संवाद साधून माघार घेण्याचा प्रयत्न केला होता. काही काळासाठी गोकुळ गीते यांनी प्रचारही थांबवला होता. मात्र अखेरीस त्यांनी निवडणूक लढवत विजय संपादन केला.

विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक असल्याचे मानले जाते. त्यामुळे या निकालाकडे केवळ स्थानिक विजय म्हणून नव्हे, तर महायुतीतील राजकीय समीकरणांचे संकेत देणारा निकाल म्हणून पाहिले जात आहे. या पराभवाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून महायुतीतील मतभेदांवरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, माझा भाजपशी थेट संबंध नाही. माझे बंधू गणेश गीते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढवू शकतो, अशी भूमिका गोकुळ गीते यांनी प्रचारादरम्यान मांडली होती. आता त्यांच्या विजयामुळे नाशिकच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे.

Tags

follow us