नाशिकच्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव जातोय; भुजबळांची नाराजी, पण महाजनांशी वाद नसल्याचा दावा
खड्ड्यांमुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
Differences between Chhagan Bhujbal and Girish Mahajan : शहरातील रस्त्यांची दुरवस्था, वाढते खड्डे आणि त्यातून घडणारे अपघात यावरून राज्यातील महायुती सरकारमधील दोन वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांवर स्वतः छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण देत कोणताही अबोला किंवा वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. नाशिक शहरातील खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासन आणि महापालिकेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
खड्ड्यांमुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले होते की, जेवढे लोक मृत्यूमुखी पडले आहेत, ते शासन आणि महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे गेले आहेत. एका मृत व्यक्तीच्या कुटुंबाला जशी मदत दिली, तशीच मदत इतर सर्व मृतांच्या कुटुंबीयांनाही मिळाली पाहिजे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही. मंत्री गिरीश महाजन यांनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
भुजबळांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर गिरीश महाजन यांनीही या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. नाशिकमधील विकासकामांची माहिती देताना त्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असल्याचे सांगितले. महाजन म्हणाले, या कामांची जबाबदारी माझी आहे. मी कुंभमेळा मंत्री म्हणून काम पाहत आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली नव्हती. कामांमुळे काही काळ नागरिकांना त्रास होणार हे मी आधीच सांगितले होते.
डांबरी रस्ते वारंवार खराब होतात, त्यामुळे आम्ही व्हाईट टॉपिंगचे रस्ते तयार करत आहोत. जवळपास चाळीस हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून रस्त्यांसह विविध सुविधा उभारल्या जात आहेत. एका रस्त्याखाली सात प्रकारच्या युटिलिटी सुविधा दिल्या जात आहेत. पुढील सहा महिन्यांत ही कामे पूर्ण होतील आणि नाशिककरांना आधुनिक शहराचा अनुभव मिळेल. दरम्यान, या वादातून भुजबळ आणि महाजन यांच्यात अबोला निर्माण झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र नाशिकमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण सोहळ्यानंतर छगन भुजबळ यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.
हे सगळं मीडियाने तयार केलेलं चित्र आहे. आमच्यात कोणताही अबोला नाही. उलट कार्यक्रमात हार अर्पण करण्यासाठी व्यासपीठावर जाताना गिरीश महाजन यांनी मला हात देऊन वर घेतले. एखादा नेता भाषण करत असताना आपण त्याचे बोलणे ऐकत असतो किंवा स्वतःच्या भाषणाची तयारी करत असतो. त्यामुळे त्यातून वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, विकासकामे आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर सरकारने अधिक लक्ष देण्याची अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे.