Eknath Shinde : दुटप्पीपणा बंद करा… एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळू नका!
पुणे : महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन अभ्यासक्रमाला मान्यता दिली होती. आता तेच लोकं दुटप्पी भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करत होते. विद्यार्थ्यांची मागणी रास्त असून त्यांना पुरेसा वेळ दिला जावा म्हणून आम्ही काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थ्यांच्या बाजुचा निर्णय घेतला होता. तसेच आयोगाला नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली होती. मात्र, काही लोकं दुटप्पी भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना उचकवत होते, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळण्यासाठी दुटप्पी भूमिका घेतल्याबद्दल टीका केली. यावेळी भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन अभ्यासक्रम रद्द केलेला नाही तर विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेऊन सकारात्मक निर्णय घेतला आहे. आता हा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार असल्याने विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारनेच तो २०२३ पासून लागू करण्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिल्या होत्या. आणि आता तेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देखील देत आहेत. ही अक्षरशः दुटप्पी भूमिका आहे. विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करू नये, असे माझे मत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विद्यार्थी हितासाठी मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला. तसेच आयोगाला देखील विनंती केली होती. त्यापद्धतीने आयोगाने त्यांचा निर्णय आज जाहीर केला आहे. या निर्णयामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या लाखों विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.