Eknath Shinde : ठाकरेंना कोंडीत पकडण्याची खेळी : भाजप-शिवसेना सावरकर यात्रा काढणार!
मुंबई : काँगेसचे राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करत आहेत. ते सातत्याने सांगतात की माझं नाव गांधी आहे सावरकर नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर होण्याची राहुल गांधी यांची लायकी देखील नाही. एवढं मोठं कार्य सावरकर यांचे आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जसे मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत मारली होती. तशी उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांच्या थोबाडीत मारणार आहे का, की नुसते जाहीर सभांमधून आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणणार आहे. अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार आहे, हे जाहीर करा. उद्धव ठाकरे यांनी ठोस कृती करण्याची गरज आहे, तरच महाराष्ट्रातील जनतेला समजेल तुम्ही खरे आहेत. अन्यथा उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आहे, असे जनतेचं मत होईल. राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आम्ही राज्यात ‘सावरकर गौरव’ यात्रा काढणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
Ravi Rana : उद्धव ठाकरे यांचे दैवत राहुल गांधी आहेत की स्वातंत्र्यवीर सावरकर ? – Letsupp
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राहुल गांधी यांनी फक्त एक दिवस सेल्युलर तुरुंगात राहुन दाखवावे. राहुल गांधी यांच्या निषेधार्थ सावरकर गौरव यात्रा काढणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुका, विधानसभा मतदार संघ, जिल्हे, गावागावातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. चळवळीदरम्यान काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. स्वातंत्र्यवीरांच्या संघर्षामुळे आपण आज स्वातंत्र्य उपभोगत आहोत. अशा सावरकर यांचा वारंवार जाणीवपूर्वक अपमान राहुल गांधी करत आहे. त्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी राज्यात सावरकर गौरव यात्रा काढणार आहे.