एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात झिरवळांचे ओएसडी संशयाच्या भोवऱ्यात; गणेश देवरेंनी केला मोठा खुलासा
गौरव पाटील यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणे हा केवळ योगायोग आहे. या प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही, असं गणेश देवरे यांनी स्पष्ट केलं.
Ganesh Devare makes a major revelation : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात आलेले मंत्री नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. आरोपी गौरव पाटील यांच्या घरात आपण भाडेकरू म्हणून राहत असल्याचं खरं असलं, तरी त्याचा आणि पेपरफुटी प्रकरणाचा संबंध जोडणं चुकीचं असल्याचं देवरे यांनी म्हटलं आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
गौरव पाटील यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणे हा केवळ योगायोग आहे. या प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही, असं गणेश देवरे यांनी स्पष्ट केलं. आपली बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. गौरव पाटील आरोपी आहे आणि मी त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहतो, यात माझा काय दोष? असा सवाल देवरे यांनी केला. आपण दोषी नसल्यामुळे कुठेही पळून गेलेलो नसून नंदुरबारमधील आपल्या घरीच असल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकरणाची गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. मी सहभागी असतो तर नंदुरबारमध्ये थांबलो असतो का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
यापूर्वी मंत्री नरहरी झिरवळ यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आपला किंवा मंत्रालयाचा पेपरफुटीशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं होतं. सर्व विभागांतील भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवली जाते. त्यामुळे या प्रक्रियेशी आपल्या खात्याचा, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा किंवा आपला संबंध नसल्याची भूमिका झिरवळ यांनी मांडली होती.
एमपीएससी पेपरफुटीवरून महेबूब शेख अडचणीत; आमदार अभिमन्यू पवारांच्या बदनामीप्रकरणी औसा पोलिसांत गुन्हा
दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक (गट-ब) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामध्ये एमपीएससीशी संबंधित अधिकाऱ्यांसह लाभार्थी परीक्षार्थी ऋतुजा पाटील हिचाही समावेश असल्याची माहिती आहे. एमपीएससीचे सहसचिव, अवर सचिव अभिजित लेंडवे, सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते आणि गोपाल मराठे यांच्यासह अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील, अमृत पाटील आणि गौरव पाटील यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गौरव पाटील यांच्या घरात मंत्री झिरवळ यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे भाडेकरू असल्याची बाब समोर आल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता देवरे यांनी हे केवळ योगायोग असल्याचं सांगत पेपरफुटीशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. तसेच आपल्यावर आरोप करून बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर पाऊल उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.