येत्या काही दिवसात महाराष्ट्र गारठणार; पुणे वेधशाळेचा इशारा

येत्या काही दिवसात महाराष्ट्र गारठणार; पुणे वेधशाळेचा इशारा

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यात थंडीची लाट सुरु झाली आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत राज्यात काही भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेने महाराष्ट्रात शीतलहर येणार असल्याचा इशारा दिला आहे.

सध्या मुंबईसह बहुतांश जिल्ह्यातलं तापमान 15 अंशांच्या खाली गेल आहे. मात्र, 5 किंवा 6 जानेवारी नंतर राज्यामध्ये थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. काही ठिकाणी शीतलहरदेखील अनुभवायला मिळेल असा अंदाजही पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सुरु आहे. तर दिल्ली उत्तर प्रदेशातही प्रचंड गारठा वाढला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे.

राज्यभरातील बहुतांश ठिकाणी तापमान घट झाली आहे. पहाटे गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. राज्यात 10 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात निफाडमध्ये सर्वात कमी 7.6 अंश सेल्सिअस तापमान आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आली असून राज्यातल्या थंडीत वाढ झाली आहे.

नवीन वर्षात किमान तापमानाचा पारा घसरल्याने निफाडकरांना हुडहुडी भरली आहे. निफाडमध्ये आज अचानक थंडीत वाढ झाल्याने 7.6 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली आहे. या गुलाबी थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube