आजपासून राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जनजागर यात्रा
पुणे : आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जनजागर यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा राज्यभर निघणार आहे.
भाजप सरकारच्या धोरणांविरोधात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन आवाज उठवला जाणार आहे. आज ( 4 जानेवारी 2023) पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यात्रेला झेंडा दाखवणार आहेत.
मोदी सरकराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाली आहे. सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आजपासून राज्यभर जनजागर यात्रा काढणार आहे.
गेल्या आठ वर्षापासून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेवर करत असलेल्या महागाई- बेरोजगारीच्या अन्याय अत्याचाराविरोधात ही यात्रा काढण्यात येत असल्याचं राष्ट्रावादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं.
संपूर्ण राज्यभरात महिला भगिनींकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर जागर यात्रा करण्यात येणार आहे. ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक शहर आणि तालुक्यात जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जनतेला जाग करण्याचं काम ही जन-जागर यात्रा करणार आहे. पुणे शहरातील हॉटेल सेंट्रल पार्क इथं खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या जनजागर यात्रेचा शुभारंभ आज दुपारी चार वाजता करण्यात येणार आहे.
त्यानंतर पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण असे करत महाराष्ट्रातील सर्वच विभागांमध्ये ही जनजागृती यात्रा जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजीया खान, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, वैशालीताई नागवडे यांसह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.