Jaykumar Gore : तब्येतीपेक्षा लोकांचे प्रश्न महत्त्वाचे, वॉकर घेऊन जयकुमार गोरे विधानभवनात
Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सभागृहात गदारोळ आणि बहिष्कार पाहायला मिळणार की खरंच जनतेच्या प्रश्नांवर खल होऊन ठोस पावलं उचलली जाणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप आमदार जयकुमार गोरे (jaykumar gore) वॉकर घेऊन सभागृहात आले.
काही दिवसापूर्वी जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात झाला होता, त्यात त्यांना मोठी इजा झाली होती. तब्येतीपेक्षा मतदारसंघातील समस्या आणि लोकांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचे असल्यामुळे अधिवेशनाला आल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले. त्यामुळे गोरे यांच कौतुक केलं जातं आहे.
हेही वाचा : उत्कंठा, घाळमेळ शाळेच्या पहिल्या दिवशी तशीच आज… पहिल्यांदा सभागृहात जाताना सत्यजित तांबे म्हणतात
“सध्या डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. परंतु मतदारसंघाचा विषय आहे, अधिवेशन काय पुन्हा पुन्हा नसते. जेवढी तब्येत सांभाळून मतदारसंघाचे प्रश्न सोडवता येतील, तेवढे सोडवू.” असं जयकुमार गोरे यावेळी म्हणाले.
जनतेच्या आशीर्वादाने नवजीवन
ते पुढे म्हणाले की, “मोठ्या अपघातातून जनतेच्या आशीर्वादाने नवजीवन मिळाले आहे. आता इथून पुढे मतदारसंघाच्या कामात, जिल्ह्याच्या आणि राज्यांच्या लोकांसाठी जे काही करता येईल ते करण्याचे प्रयत्न करणार आहे. माझ्या मतदारसंघातील दुष्काळी भागातील पाण्याचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते, ते मागच्या काळखंडामध्ये पैसे असतानाही आघाडीने भाजपचा आमदार आहे म्हणून सगळी काम थांबवली होती. ती सगळी काम वेगाने चालू झाली आहेत.’