नैतिकता जपण्यासाठी उद्धव ठाकरेंचा राजीनामा; ‘त्या’ निर्णयावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…
Jitendra Awhad On Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)यांच्या बाजूने लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)मुख्यमंत्री शिंदेंना मोठा दिलासा दिला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. आजच्या निकालात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा हा मुद्दा महत्वाचा ठरला. त्यावरुनच भाजपसह शिवसेना शिंदे गटाकडूनही जोरदार टीका केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धगधगते पाक : माजी विदेश मंत्रीही अटकेत; तीन प्रांतांमध्ये लष्कर
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील शेवटचं वाक्य म्हणजे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना परत मुख्यमंत्री म्हणून त्यांना बसवू शकलो असतो. याचा अर्थ त्याच्या आधी ज्या काही केलेल्या ज्या काही कारवाया आहेत, त्या नैतिकतेला धरुन नाहीत, हे त्याच्यावरुन स्पष्ट होतं अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
न्यायालयाच्या निर्णयात परत ते पहिल्याच वाक्यामध्ये असं म्हणतात की, मुख्य प्रतोद नेमण्याचा अधिकार हा पक्षाला आहे. त्याच्यामुळे सुनील प्रभू हेच व्हीप राहतील. व्हीप किती महत्वाचा आहे, हे आपल्याला गेल्या काही महिण्यांतील घडामोडींमध्ये दिसून आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या प्रत्येक निर्णयावर टीका केली आहे.
आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आता फक्त 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय बाकी आहे. मला असं वाटतं की आजचा निर्णय हा 99 टक्के सरकारच्या बाजूने आहे. फक्त ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणं हाच मुद्दा समोर आला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, एवढं सगळं झाल्यावर मी नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्रिपदावर राहणं हे मला मान्य नव्हतं. हा प्रश्न फक्त नैतिकतेचा आणि अनैतिकतेचा आहे.
सर्वोच्च न्यायालय स्पष्टपणे म्हणाले की, ही जी काही राजकीय स्थित्यंतरं झाली होती, ती अनैतिक होती. फक्त नैतिकता मानतं कोण हाच प्रश्न आहे. असा सवालही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. त्याचवेळी आव्हाड म्हणाले की, आम्ही त्यावेळी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की, आपण राजीनामा देऊ नका, पण एखाद्याचा निर्णय असतो, एखाद्याची मानसिकता असते की, माझ्यासोबत एवढं झाल्यानंतर मी कशाला राहू पदावर असंही असतं. कदाचित पदापेक्षाही आपली नैतिकता मोठी आहे, नैतिकदृष्ट्या महाराष्ट्राला दाखवण्यासाठी की मी सत्तेसाठी लढत नाही हा मनीभाव असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन मोकळे झाले, असेही यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले.