कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू
बेळगाव : आजपासून कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू होत आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. कर्नाटकात कलम 144 लागू केले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. तरी देखील कर्नाटक सरकारनं पुन्हा आपला रंग दाखवला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित मेळाव्यासाठी उभारलेल्या स्टेजच्या उभारणीचं काम थांबवलं असून स्टेज हटवलं आहे. रविवारी मेळाव्यास कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. आता अचानक काम थांबवलं आहे.
बेळगावचे पोलीस उपायुक्त रवींद्र गाडादी यांनी काम थांबवण्याचे आदेश दिलेत. गाडादी म्हणाले की, मेळाव्यासाठी कोणतीही परवानगी दिली नाही. त्याबाबत एकीकरण समितीला पत्र देखील दिलं आहे. मेळाव्यात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परवानगी नाकारली आहे. तर रविवारी रात्री स्टेजसाठी कर्नाटक पोलिसांकडून परवानगी दिली होती. आज अचानक पोलिसांनी स्टेजचं काम थांबवल्यानं आमची गळचेपी झाल्याची प्रतिक्रिया महराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी दिलीय.
महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमाप्रश्नामुळं तयार झालेला वाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बैठक देखील घेतली. आपण बेळगाव सीमेवर जाणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केलं होतं, आता मात्र हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि खासदार धैर्यशील माने सीमाभागाचा दौरा करणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिलीय. सीमाभागातील मराठी बांधवांशी संवाद साधणार आहे. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं देखील देसाई यांनी सांगितलं.