कांद्याचा मुद्दा राजकीय गुद्दा, विधीमंडळातही घमासान; मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केली घोषणा..

कांद्याचा मुद्दा राजकीय गुद्दा, विधीमंडळातही घमासान; मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केली घोषणा..

Maharashtra Budget Session : विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कांद्याच्या मुद्द्यावरून झाली. राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांनी गळ्यात कांदा आणि कापसाच्या माळा घालून आंदोलन केले. कांद्याला हमीभाव (Onion Price) मिळावा यासाठी हे आंदोलन होते. त्यानंतर सभागृहातही कांद्याचाच मुद्दा होता. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार प्रहार केले. कांदा खरेदी सुरू करावी, कांद्याच्या निर्यातीत सातत्य ठेवण्याची मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) उत्तर देत असतानाही विरोधकांचा गोंधळ सुरू होता.

गोंधळ वाढत असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मोर्चा सांभाळला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपल्याला मार्ग काढायचा की राजकारण करायचे, असे त्यांनी म्हटल्यानंतर सभागृह शांत झाले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नाफेडने कांदा खरेदी सुरू केली असून जेथे खरेदी सुरू झालेली नाही तेथे ती सुरू केली जाईल,अशी ग्वाही दिली. तसेच कांदा निर्यातीवर (Onion Export) कोणतेच निर्बंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वाचा : Maharashtra Budget Session : कांदाप्रश्नी विरोधकांनी घेरलं; शिंदेंच्या मदतीला पुन्हा फडणवीस धावले

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या आंदोलनाने झाली. सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उद्धवस्त.. शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो..कांद्याला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्य माळा घालत त्यांनी या गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

विधानभवनाच्या पायर्‍यांवर राडा, विरोधकांचं कांद्याच्या माळा घालून आंदोलन

या मुद्द्यावर सभागृहात चर्चा सुरू असताना भुजबळ म्हणाले, की कांद्याचा प्रश्न गंभीर आहे. मुख्यमंत्री शेतकरी आहेत. ते शेती करतात. तुर्की आणि पाकिस्तानात कांद्याला जास्त मागणी आहे. अन्य देशातील व्यापारी आपल्या कांद्याला नकार देतात कारण आपले निर्यातीत सातत्य नाही. त्यामुळे दिल्लीतील सरकारशी बोलून यावर मार्ग काढावा अशी मागणी केली.

अजित पवार म्हणाले,की आज कांदा आणि कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. काल एका शेतकऱ्याने विष घेण्याचा प्रयत्न केला. या समस्यांवर मार्ग काढणे गरजेचे आहे. केंद्रातील सरकारने याचा विचार केला पाहिजे,असे पवार म्हणाले.

सरकारकडून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी सुरू आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासाठी लढत राहणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube