धनंजय मुंडेंच्या विरोधात शरद पवारांचा मोठा डाव; परळीत मराठा कार्ड, कोण आहेत राजेसाहेब देशमुख?
Dhananjay Munde vs Rajesaheb Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये शरद पवारांनी परळी विधानसभेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिला आहे. काँग्रेस पक्षातून नुकताच राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात गेलेले राजेसाहेब देशमुख यांना पवारांनी मैदानात उतरवलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये मराठा कार्ड पुन्हा एकदा बाहेर काढत शरद पवार यांनी मोठी खेळी केली असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
राजेसाहेब देशमुख कोण आहेत?
राजेसाहेब देशमुख यांनी एक महिन्यांपूर्वीच काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचंही म्हटलं होतं. राजेसाहेब देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये मागील महिन्यात प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी बीड जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य सभापती पद सांभाळलं आहे. देशमुख हे काँग्रेसच्या रजनी पाटील यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात.
शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात दिला तगडा उमेदवार
बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार नेमकी कोणती खेळी खेळून उमेदवार देतात? त्याची उत्सुकता लागली होती. आता शरद पवारांनी या मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते. मात्र, काँग्रेसला खिंडार पाडत शरद पवारांनी त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये करून घेतला आणि हा प्रवेश झाल्यानंतर त्यांना परळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
आव्हानात्मक परिस्थिती
राजेसाहेब देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली आहे. परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आहेत. महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडे कृषीमंत्रीपद होतं. लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. आता विधानसभा निवडणकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषिमंत्री धनंजय मुंडे ही निवडणूक यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि पक्ष फुटीमुळे पुन्हा आव्हानात्मक जाणार असल्याची शक्यता वर्तवली जातं आहे.