‘अजितदादा उपमुख्यमंत्रीपदासाठी कायम तयार, मला त्यांची दया येते’; कोश्यारींचा खोचक टोला
Ajit Pawar : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात राज्यपाल नावाचं विशेष गाजलं होतं. महाविकास आघाडी सरकार आणि त्यावेळचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यात अनेक मुद्द्यांवरून वाद झाला होता. त्यांची राज्यातील कारकिर्द अतिशय वादळी ठरली. कोश्यारी राज्याचे राज्यपाल असताना अनेक नाट्यमय घडामोडी ठरल्या. आता तेच कोश्यारी राज्यपाल नसतानाही त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
इंडिया टुडे समूहाच्या एका कार्यक्रमात माजी राज्यपाल कोश्यारींना अजित पवार (Ajit Pawar) आणि फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांच्या विचारांत स्पष्टता आहे. आपल्या उत्तराखंडमध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही पराभव झाले तरी ते हार मानत नाहीत. तसेच अजित पवार आहेत. त्यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री व्हायला सांगा, ते कायम तयार असतात, असे कोश्यारी म्हणाले.
Sharad Pawar : राष्ट्रवादीत फूट का पडलेली नाही? शरद पवारांनी सांगितलं शास्त्रीय कारण
मला कधीकधी अजित पवार यांची (Ajit Pawar) दया येते. ते माणूस म्हणून चांगले आहेत. अतिशय हुशार आहेत. त्यांच्याकडे चांगला जनाधार आहे. संघटनेत त्यांचं वजनही आहे. पक्षावर मजबूत पकड आहे. त्यामुळेच आताच्या घडीला पक्षातील बहुतांश आमदार त्यांच्यासोबत आहेत, असेही कोश्यारी म्हणाले.
2019 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच मुद्दा पुढे करत शिवसेना भाजप युती तुटली होती. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली. या घडामोडी घडत असतानाच अजितदादांनी धक्कातंत्राचा वापर करत पहाटे अचानक देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घडामोडीमुळे त्यावेळी राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं.