आरक्षण मिळाल्याशिवाय मी माघारी फिरणार नाही… उन्हात उपोषण सुरू केल्यानंतर मनोज जरांगेचा सरकारला इशारा

कोणत्याही परिस्थितीत लाठीचार्जसारखा प्रकार करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा मराठा समाज असे आंदोलन उभे करेल ज्याचा सरकारने विचारही केला नसेल.

  • Written By: Published:
Untitled Design 7 3

Manoj Jarange’s warning to the government : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले असून, अंतरवाली सराटी येथून त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या न्यायासाठी शेवटपर्यंत लढणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. मला माझा समाज आणि समाजातील लेकरं महत्त्वाची आहेत. माझ्या समाजासाठी मी मरायलाही तयार आहे, असे भावनिक वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणाची सुरुवात केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत यावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना जरांगे पाटील म्हणाले की, मी सरकारला वाईट बोलत नाही. सरकारने संवाद साधावा आणि पर्याय काढावा. मात्र पुन्हा एकदा लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न करू नये. एकदा हल्ला झाला आहे. मुख्यमंत्री आणि सरकारला सांगतो की, पोलिसांकडून पुन्हा लाठीचार्ज झाला तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. मराठा समाज असे आंदोलन करेल, ज्याचा विचारही सरकारने केला नसेल.

देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख करत त्यांनी म्हटले की, एक हल्ला केल्याने किती नुकसान होते, याचा अनुभव त्यांनी आधीच घेतला आहे. त्यामुळे आता तसं होणार नाही, अशी अपेक्षा आहे. आपण उपोषणावर ठाम असल्याचे पुन्हा स्पष्ट करत जरांगे पाटील म्हणाले, माझं कर्तव्य मी पार पाडतोय. मराठा समाजाच्या कल्याणासाठी मी आमरण उपोषण करतोय. मंत्री भेटायला येतील, चर्चा करतील, सरकार येत राहील आणि जात राहील, पण मी उपोषणावर ठाम आहे.

रात्रभर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्षांच्या बैठका झाल्याची माहिती मिळाल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या प्रस्तावित ड्राफ्टवरही भाष्य केले. ड्राफ्ट येईल, आम्ही तो पाहू. मात्र केवळ ड्राफ्ट देऊन चालणार नाही. शासनस्तरावर स्पष्ट आदेश आणि सूचना अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

विधानपरिषद निवडणूक : अहिल्यानगरची लढत फिक्स; प्राजक्त तनपुरे विरुद्ध करण ससाणे भिडणार ?

मराठा आरक्षणाच्या संदर्भातील 58 लाख नोंदींचा मुद्दा उपस्थित करत जरांगे पाटील म्हणाले, 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्या सर्वांना कुणबी प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश शासनाने काढावेत. जर अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिले नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेशही द्यावेत. शासनाचा आदेश प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे.

हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, स्थानिक चौकशी अहवालाच्या आधारे जे अर्ज करतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि वैधता द्यावी. जर ती दिली नाही तर संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश सरकारने काढावा. सातारा संस्थानच्या जीआरचा मुद्दा उपस्थित करत जरांगे पाटील म्हणाले, सातारा संस्थानचा जीआर काढणं आवश्यक आहे. तो काढायला कोणतीही अडचण नाही. 1994 ची नियमावली, 1990 च्या अध्यादेशाची नियमावली आणि 2012 च्या कायद्यानुसार नियमावली लागू करता येईल. हैदराबाद गॅझेटच्या जीआरलाही तीच नियमावली लागू करता येईल.

मात्र कोणताही जीआर काढला तरी त्याला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. मराठ्यांच्या नशिबातच चॅलेंज आहे. कितीही चांगला जीआर काढला तरी तो न्यायालयात आव्हान दिला जातो. गायकवाड आयोगाने 12 ते 13 टक्के आरक्षण दिले, त्यालाही आव्हान देण्यात आले होते, असे ते म्हणाले.

मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मागणी करत त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा करावी. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन नव्या नोंदी शोधण्याचे काम सुरू ठेवावे. गुन्हे मागे घेण्याबाबतही त्यांनी सरकारकडे मागणी केली. गृहमंत्रालयाकडे अधिकार आहेत. सरकार गुन्ह्यांमधील कलमे कमी करू शकते किंवा गुन्हे मागे घेऊ शकते, असे ते म्हणाले.

लाखो शिक्षकांना दिलासा; TET पास होण्यासाठी एक वर्षाची मुदत, मात्र परीक्षा अनिवार्य असल्याचा सुप्रीम कोर्टाचा पुनरुच्चार

राज्यातील सत्ताधारी पक्षांनाही त्यांनी संदेश दिला. भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी कोणताही पक्ष असो, आम्हाला फक्त न्याय हवा आहे. सरकारने जीआर काढून मराठा समाजाला न्याय द्यावा, असे जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, अंतरवाली सराटीत मोठ्या प्रमाणात जमलेल्या मराठा बांधवांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. मराठा समाजाने अंतरवाली सराटीकडे येऊ नये. आपली लढाई सुरूच राहणार आहे. सरकारने आमच्या कोट्यवधी मराठा लेकरांचा उन्हाळा केला आहे. आज आपण लढलो नाही तर पुढच्या पिढीचे नुकसान होईल. त्यामुळे मराठा समाजाने वेळोवेळी संघर्षासाठी सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पहिला दिवस असून, मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींना पुन्हा वेग आला आहे.

Tags

follow us