अकोल्यातील सिटी हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

अतिदक्षता विभागात, जनरल वॉर्ड ऑपरेशननंतर ठेवण्यात आलेले काही रुग्ण देखील रुग्णालयात उपस्थित असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

  • Written By: Published:
Untitled Design 62 1

Massive fire breaks out at City Hospital : अकोला शहरातील मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या रामदासपेठ परिसरात असलेल्या खासगी सिटी हॉस्पिटलमध्ये आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आग लागली त्यावेळी हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर उपचार घेणारे अनेक रुग्ण दाखल होते. विशेष म्हणजे अतिदक्षता विभागात, जनरल वॉर्ड तसेच ऑपरेशननंतर निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेले काही रुग्ण देखील रुग्णालयात उपस्थित असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

आगीची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, सुरक्षा रक्षक आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. धुराचे लोट संपूर्ण इमारतीत पसरू लागल्याने रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अक्षरशः जीवाची बाजी लावून प्रयत्न करण्यात आले. काही रुग्णांना स्ट्रेचरवरून, तर काहींना नातेवाईकांच्या मदतीने तातडीने बाहेर हलवण्यात आले. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरसह बाहेर काढण्यात आल्याचे देखील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

नीट घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी; इंजिनिअरिंग-फार्मसी प्रवेशांना मोठा विलंब

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन अग्निशमन विभागाला तात्काळ पाचारण करण्यात आले. काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पोलीस प्रशासनाने देखील परिसर बंदिस्त करत नागरिकांची गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटल परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्राथमिक माहितीनुसार, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट झालेले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विद्युत यंत्रणा, एसी युनिट किंवा हॉस्पिटलमधील इतर उपकरणांमधुन आग लागली का, याचा तपास प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून काही रुग्णांना शहरातील इतर खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये हलवण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे अकोला शहरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून खासगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाकडून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

follow us