‘समर्थ क्रॉप’चा म्होरक्या अखेर गजाआड, फसवणुकीची मोडस कशी होती ?

Prashant Gawali- समर्थ क्रॉप केअर या कंपनीने अहिल्यानगरमधील गुंतवणूकदारांना फसविले आहे. ही फसवणूक तब्बल ४ कोटी १९ लाखांची.

  • Written By: Published:
Prashnat Gawali

अहिल्यानगर: जास्त व्याज, आकर्षक कमिशनला गुंतवणूकदार भुलतात आणि हातचा पैसा गमवितात. अहिल्यानगर जिल्ह्यात तर शेअर मार्केट गुंतवणुकीमध्ये तर लोक कंगाल झालेत. त्यानंतरही लोकांचे डोळे उघडलेले नाहीत. नगर जिल्ह्यात आणखी फसवणुकीचे प्रकार उघडकीस आला आहे. जास्त व्याज व आकर्षक कमिशनचे आमिष दाखवत समर्थ क्रॉप केअर या कंपनीने अहिल्यानगरमधील गुंतवणूकदारांना फसविले आहे. ही फसवणूक तब्बल ४ कोटी १९ लाख ५६ हजार ६५० रुपयांची आहे. ही फसवी योजना चालविणारा चेअरमन प्रशांत अनिल गवळी ( Chairman Prashant Anil Gawali ) हा अखेर गजांआड झालाय. एका फसवणुकीच्या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी (Kotwali) त्याला जेरबंद केलंय. नेमकी काय होती गवळी याची मोडस? नेमकं कसा चालायचा हा स्कॅम? चला जाणून घेऊयात…

प्रशांत गवळी याने काही वर्षांपूर्वी समर्थ क्रॉप केअर या नावाने इन्व्हेस्टमेंट कंपनी स्थापन केलीय. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. गुंतवणूक करा आणि इतरांना जोडून साखळी पद्धतीने व्यवसाय वाढवा. त्यातून अधिक व्याज आणि कमिशन मिळेल असे, आश्वासन देण्यात आला आहे. या दामदुप्पटच्या आमिषाला बळी पडून राज्यातील अनेक शेतकरी व तरुणांनी गुंतवणूक केली. तसेच ओळखीतील इतरांनाही यात सहभागी करून घेतले. प्रारंभी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्याने विश्वास वाढत गेला. परिणामी अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मोठी रक्कम जमा करणाऱ्यांना परदेश दौऱ्याचे आमिष दाखवून दुबई सहलींचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सुमारे एक ते दीड वर्ष व्यवसाय सुरळीत सुरू राहिल्यानंतर अचानक परतावा व एजंटांचे कमिशन बंद झाले. यानंतर गुंतवणूकदारांमध्ये संशय निर्माण झाला. परिणामी ज्यांनी इतरांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले होते, त्या एजंट आणि गुंतवणूकदारांमध्ये वाद वाढू लागले.

भिंगारमधील राकेश प्रेमेंद्र बोरगे यांनी एक तक्रार दिली होती. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) आदी कलमान्वये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांची भर घालण्यात आलीय. पुढील तपासासाठी हा गुन्हा कोतवाली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे १०० गुंतवणूकदारांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. त्यातील अंदाजे ४ कोटी १९ लाख ५६ हजार ६५० रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रशांत गवळी याच्यासह हडपसर, पुणे येथील ज्योती प्रशांत गवळी, प्रकाश मांगपे, नागनाथ दगडू जाधव, गणेश सुधाकर क्षीरसागर, दत्तात्रय नामदेव बेंगडे, माया अरूण थोरात, अरूण दत्तात्रय थोरात तसेच अहिल्यानगर येथील यासिन बाबू पठाण व देविदास सावंत यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे कंपनीचा संचालक गवळी हा धार्मिक भावनेचा वापर करत असल्याचेही समोर आले असून, फसवणूक झालेल्या अनेकांचा त्याच्यावर विश्वास बसण्यामागे हा घटक कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती अहिल्यानगर, पुणे, सोलापूरसह राज्यातील 12हून अधिक जिल्ह्यात पसरली असल्याने फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us