…म्हणून गुलाबराव पाटलांना शेतकऱ्यांकडं पाहायला वेळ नाही; जयंत पाटलांचा घणाघात

…म्हणून गुलाबराव पाटलांना शेतकऱ्यांकडं पाहायला वेळ नाही; जयंत पाटलांचा घणाघात

जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी सोमवारी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देत मंत्री गुलाबराव पाटलांवर परखड टीका केली आहे. त्याचबरोबर शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेतून जे 40 आमदार फुटून गेले आहेत, त्यांच्याबरोबर आता लोकं राहिलेली नाहीत, प्रत्येक गोष्ट त्यांना अडचणीची ठरु लागली असल्याची टिकाही यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

अवकाळी पावसामुळे राज्यभर पिकांचं नुकसान झालं पण जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव सोडून बाहेर कठेच गेले नाहीत, असा प्रश्न केल्यावर जयंत पाटील म्हणाले की, गुलाबराव पाटलांना बाकीचे उद्योग करण्यासाठी त्यांना वेळ पाहिजे, बाकीची बरीच कामं त्यांच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे अवकाळी पावसात संकटात पडलेल्या शेतकऱ्यांकडं पाहायला त्यांच्याकडं वेळ नाही.

Ajit Pawar यांचा राज्य सरकारला इशारा… अन्यथा लोकं रस्त्यावर उतरतील!

आम्ही विधानसभेतही याच्यावर आवाज उठवला. सरकारकडून त्या शेतकऱ्यांना मदत करायची घोषणादेखील केलेली नाही. यापूर्वी ज्या घोषणा झाल्या त्याचे पैसेही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, त्याच्यामुळे महाराष्ट्रातील अवकाळी पावसात आणि यापूर्वीच्या संकटात सापडलेला शेतकरी या सरकारवर प्रचंड नाराज असल्याचं यावेळी जयंत म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेतून फुटून गेलेल्या 40 जणांची आता अडचण झाली आहे. त्यांना खोक्यांची गोष्ट तर प्रचंड अडचणीची वाटत आहे. त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी अनेक आमदार काहीही बोलत आहेत. त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेनं काय करायचं हे ठरवलेलं आहे.

उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना दिलेल्या इशाऱ्यावरुन प्रश्न केला असता त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्येच ते सांगितलं आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर त्यांची ती प्रतिक्रीया आहे. आमच्या भूमिकेचा त्याच्यात काही प्रश्नच येत नाही. राहुल गांधींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची ती प्रतिक्रिया आहे.

त्याचवेळी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरुन प्रश्न केला असता जयंत पाटील म्हणाले की, अलिकडे कोणी कोणालाही भेटू शकतं, त्यामुळे त्याच्यावर लगेच प्रतिक्रीया द्यावी असं मला वाटत नाही, असं म्हणत त्यांनी त्यावर बोलणं टाळलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube