जयंत पाटलांचा कडेकोट बंदोबस्त, अजित पवारांच्या गळाला सांगलीतील एकही आमदार नाही

जयंत पाटलांचा कडेकोट बंदोबस्त, अजित पवारांच्या गळाला सांगलीतील एकही आमदार नाही

– ऋषिकेश नळगुणे :

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राज्याच्या बहुतांश जिल्ह्यातील आमदारांनी पटापट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत सत्तेत उड्या घेतल्या. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, बुलढाणा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील आमदारांनी अजित पवार यांची साथ दिली. इतकच काय तर छत्रपती संभाजीनगरमधील विधानपरिषदेवरील आमदारांनीही शरद पवार यांची साथ सोडून सत्तेत सहभागी होणं योग्य समजलं. याच सगळ्यामुळे आज राष्ट्रवादीचे 35 ते 40 अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार करतात. (Not a single MLA went with Ajit Pawar in Sangli district, all are with Sharad Pawar and Jayant Patil)

मात्र या सगळ्यात अजित पवार यांना सांगली जिल्ह्याने मात्र साथ दिलेली नाही. हा जिल्हा आजही शरद पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण हे प्रामुख्याने सहकाराभोवती फिरत असल्याच दिसून येतं. पक्षातील बहुतांश नेते देखील ऊस पट्ट्यातूनच येतात. त्यामुळे साखर कारखानदारी, दूध संघ, सहकारी बँका यातूनच या नेत्यांचं राजकारण चालत असतं. या गोष्टींमुळेच राष्ट्रवादीच्या वाढीसाठी पश्चिम महाराष्ट्राची जमीन पोषक ठरली. शरद पवार आणि राष्ट्रावादीला पश्चिम महाराष्ट्राने पहिल्यापासूनच भक्कम साथ दिली. सांगलीतही ऊस, साखर , दूध याभोवती राजकारण फिरतं. मात्र तरीही या जिल्ह्यातील सर्वच सर्व आमदारांनी विरोधात राहणचं पसंत केलं.

PM मोदी अन् गृहमंत्र्यांनी मणिपूरसाठी वेळच दिला नाही! भाजप आमदाराच्याच आरोपांनी देशात खळबळ

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 4 आमदार आहेत. यात पहिले तर इस्लामपूर-वाळवा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव येतं जयंत पाटील हे पहिल्या दिवसापासून शरद पवार यांच्यासोबतच आहेत. राष्ट्रवादीचे सर्वाधिक दिवस प्रदेशाध्यक्षपद भूषविलेले नेते म्हणूनही पाटील यांना ओळखलं जातं. 5 वर्षांहून अधिक काळ ते प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतं आहेत. याशिवाय विधान सभेतील गटनेते म्हणून पाटील यांच्याकडेच जबाबदारी आहे. सोबतच पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधील उमेदवार, प्रचार, धोरण ठरविणं असो, त्यांना वेगवेगळी पद देणं असो आणि त्यातून ताकद देणं असो.

इतकंच काय तर पक्षाची महाराष्ट्रातील रसद संभाळण्याची जबाबदारी देखील जयंत पाटील यांनाच देण्यात आली होती, असं अनेकदा नेते दबक्या आवाजात सांगायचे. एक प्रकारे दैनंदिन घडामोडींमध्ये लक्ष न घालता शरद पवार यांनी पाटलांना राज्यातील निर्णयाचे सर्वाधिकार देऊ केले होते. शरद पवार यांनी पाटलांना दिलेली हीच ताकद अजित पवार आणि काही आमदारांच्या चर्चेता विषय ठरला होता. यातूनच राष्ट्रवादीत दोन गट झाले असल्याच्याही चर्चा होत्या. अजित पवार यांचा एक गट आणि जयंत पाटील यांचा दुसरा गट. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतरही अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जयंत पाटील यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांना विठ्ठलाची उपमा देत त्यांच्या भोवतीच्या तीन बडव्यांचा उल्लेख केला. या तीन बडव्यांपैकी एक जयंत पाटील असल्याचंही बोललं गेलं.

Jayant Patil : अजितदादांनी दिला बक्कळ निधी; जयंत पाटील म्हणाले, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून…

आता राज्यातील राष्ट्रावादीचा प्रमुख चेहराच सांगलीत असेल तर इतर आमदारांना जयंत पाटील यांच्या मदतीशिवाय आपलं राजकारणच होऊ शकणार नाही, याची पक्की खात्री असणार. त्यामुळेच त्यांनी जयंत पाटील यांच्यासोबतच कायम राहण्याचा निर्णय घेतला. यात नाव घ्यावं लागतं ते शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांचं. नाईक हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांना तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी जयंत पाटील यांच्या वाळवा तालुक्यातील 48 गावांचं मतदान आवश्यक आहे. याचबरोबर सांगली जिल्हा बँकेचं अध्यक्षपदही सध्या त्यांच्याकडेच आहे. यामुळे आमदार पाटील यांच्या मदतीशिवाय शिराळा आपल्या ताब्यात राहणार नाही, याची जाणीव त्यांना आहे.

तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमन पाटील यांचं सूत्र थोडं निराळं आहे. जयंत पाटील यांच्यासोबत आर.आर. पाटील यांच्या गटाचे पहिल्यापासूनच फारसं सख्य नाही. मात्र आर. आर. पाटील यांची निष्ठा शरद पवार यांच्याशी कायम होती. आर. आर. पाटील यांना ताकद देण्यात, त्यांना आमदार, प्रदेशाध्यक्ष, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री करण्यात शरद पवार यांची मुख्य भूमिका होती. याशिवाय तासगांव-कवठेमहाकांळ भागात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आर. आर. पाटील यांचा दोनदा झालेला निसटता विजय शरद पवार यांच्यामुळेच शक्य झाला होता.

बंडानंतर बोलतानाही सुमन पाटील यांनीही आज आर. आर. आबा असते तर त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याची भूमिका घेतली असती हे वाक्य आवर्जून अधोरेखित केलं होतं. याशिवाय भविष्यात चिरंजीव रोहित पाटील यांचं राजकारण हे शरद पवार यांच्यासोबतच होऊ शकत. जिल्ह्यात त्यांना निवडून येण्यासाठी जयंत पाटील यांच्या मदतीची अत्यावश्यक गरज असणार आहे, हेही सुमन पाटील ओळखून आहेत. त्यामुळे सुमन पाटील यांनीही शरद पवार यांच्यासोबतच राहण्यात धन्यता मानली असावी.

भविष्यात नियतीच्या मनात काय सांगता येत नाही; अजितदादांच्या CM पदाबाबत मुश्रीफांचे मोठे विधान

राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील चौथे आमदार म्हणजे विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघातील अरुण लाड. क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांचे चिरंजीव असलेल्या अरुण लाड यांना त्यांच्या घरातूनच विचारधारेचं, राजकारणाचं आणि समाजकारणाचं बाळकडू मिळालं. काँग्रेसी विचारांच्या असलेल्या लाड यांच्या विचारधारेत भाजप कुठेच बसत नाही. घरातूनच मिळालेल्या या विचारधारेला सध्याच्या राजकीय परिस्थितीचीही जोड आहे. लाड यांचा मतदारसंघ येतो सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये. पुणे आणि साताऱ्याचा काही भाग वगळता लाड यांना निवडून येण्यासाठी कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या भागात जयंत पाटील यांची मोठी मदत झाली होती.

याशिवाय क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, क्रांती दूध संघ, शिक्षण संस्था, पलूस तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी या त्यांच्या संस्था जयंत पाटील यांच्या मतदारसंघाला अगदी खेटूनच आहेत. इथे त्यांना जयंत पाटील यांची मदत अत्यावश्यक आहे. सोबतच सांगली जिल्हा परिषदेत अरुण लाड यांचा मुलगा शरद लाड सक्रिय आहेत. ते विरोध गटाचे नेते होते. आगामी काळात मुलाच्या राजकारणासाठीही जिल्ह्यात लाड यांना अजित पवार यांच्यापेक्षा जयंत पाटील कधीही फायदेशीर ठरतात. त्यामुळेच बांधावरची भांडण टाळण्यासाठी अरुण लाड यांनीही शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या सोबतच राहणं पसंत केलं असण्याची शक्यता आहे. एकूणच काय तर प्रत्येकाची वैयक्तिक कारण असली तरीही शरद पवार यांच्यासोबत राहण्याची प्रत्येकाची भूमिका कायम आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube