आता जशास तसं उत्तर, धमकीनंतर आमदार देशमुख थेट नरिमन पॉईंटवर

आता जशास तसं उत्तर, धमकीनंतर आमदार देशमुख थेट नरिमन पॉईंटवर

मुंबई : गुवाहाटीवरुन सुटून आलेले आमदार नितीन देशमुख(Nitin Deshmukh) यांना आलेल्या धमकीनंतर त्यांनी नरिमन पॉईंटवर जात धमकी देणाऱ्या राणे समर्थकाची वाट पाहिली, मात्र तिथं कोणीही आले नसल्याचं नितीन देशमुख यांनी सांगितलं आहे. दोन दिवसांपूर्वी फोनद्वारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समर्थकाने आपल्याला धमकी देत इथे बोलावले होतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. यावेळी देशमुख यांनी राणे कुटुंबियांवर निशाणा साधला आहे.

मात्र, राणे कुटुंबियांसह त्यांच्या समर्थकांच्या मनगटात दम नव्हता म्हणूनच ते आले नाहीत. आता यापुढे हा बाळासाहेबांचा शिवसैनिका त्यांना जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांनी धमकी देणाऱ्यांना दिला आहे. तसेच हा राणे कोण होता, त्याला कोणी मोठा केला, हा राणे बाळासाहेबांच्या जीवावर मोठा झाल्याचंही त्यांनी म्हंटलय.

आता या कोंबडीचोरामध्ये कोंबड्या पकडण्याचीही ताकद राहिली नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. मी रोज नरिमन पॉईंटला त्यांची वाट बघणार असून ते ज्या पध्दतीने वार करतीच अगदी त्याच पध्दतीने मी वार करणार असल्याचा इशाराच देशमुख यांनी दिला आहे.

राणे कायमच मुर्खासारखं वक्तव्य करत असतात. कोणीतरी त्यांना जाऊन सांगा की, तुम्ही हे कोंबडीसारखं बकणं बंद करा, मी धमकी देणारा माणूस नसून त्यांनी कुठे बोलावलं तर मी जाणार आहे. त्यांनी ठाकरे घराणे आणि शिवसेनवर वाईट वक्तव्य करु नये हीच माझी अपेक्षा असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, मला आलेल्या धमकीबद्दल कोणतीही तक्रार करणार नसून या सरकारमध्ये मला कोणताही न्याय मिळणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच मुंबईतील शिवसैनिकाचं सोडा, विदर्भाच्या शिवसैनिकाला मुंबईत फिरणं बंद करुन दाखवा, असं आव्हानच त्यांनी राणे आणि त्यांच्या समर्थकांना दिलंय.

दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीकडून आमदार देशमुख यांना धमकीचा फोन आला होता. मी राणे कुटुंबियांविरोधात बोलल्याने धमकीचा फोन आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आता फोनवर केलेल्या संभाषणानूसार नरिमन पाईंट परिसरात दाखल होत धमकी देणाऱ्यांची वाट पाहिली मात्र, तिथे कोणीही आले नसल्याने तुम्ही मला कुठेही बोलवा मी तिथं येणार असल्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube