कांद्याचे दर कोसळले; ट्रॅक्टर व कांद्यासह नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको
Onion Prices Crash : कांदा पिकवूनही हातात काहीच राहत नाही, मग जगायचं कसं? असा आक्रोश करत कांदा उत्पादक शेतकरी शुक्रवारी रस्त्यावर उतरले.
Onion Prices Crash : कांदा पिकवूनही हातात काहीच राहत नाही, मग जगायचं कसं? असा आक्रोश करत कांदा उत्पादक शेतकरी शुक्रवारी रस्त्यावर उतरले. कांद्याच्या भावात झालेल्या अभूतपूर्व घसरणीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नगर-कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडत शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. कांद्याला योग्य हमीभाव मिळावा, प्रतिक्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे, निर्यातबंदी तात्काळ उठवावी तसेच बाजार समित्यांमधील दलाली आणि शोषण बंद करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील (Nagar-Kalyan Highway) वाहतूक विस्कळीत झाली होती. कष्ट आमचे, नफा व्यापाऱ्यांचा आणि तोटा शेतकऱ्यांचा, ही व्यवस्था आता चालणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरकांद्यासह (Onion Prices Crash) रस्त्यावर ठिय्या मांडत सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला. अनेक शेतकरी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून आपल्या व्यथा मांडताना दिसून आले. यंदा उत्पादन खर्च प्रचंड वाढला असताना बाजारात कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढत असताना दुसरीकडे बाजारात कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नसल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
आंदोलनकर्त्यांनी शासनावर गंभीर आरोप करत बाजार समित्यांमध्ये व्यापारी आणि दलालांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप केला. तसेच साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रवींद्र राजदेव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू असून परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
‘राजा शिवाजी’ तिसऱ्या आठवड्यात दमदार कामगिरीसाठी सज्ज; आतापर्यंत 84.70 कोटींची कमाई-
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष दिले नाही तर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. कांद्याच्या दरघटीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप आता रस्त्यावर उतरला असून, शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.