महाप्रसाद, इफ्तार आणि लंगर आता रडारवर; तुकाराम मुंढेंकडून वर्षभरासाठी स्थायी आदेश लागू

Tukaram Munde: नव्या आराखड्यानुसार आता सणाच्या 21 दिवस आधीपासूनच एफडीएची तयारी आणि तपासणी मोहीम सुरू होणार आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Tukaram Munde

Tukaram Munde : सण उत्सावात मोठ्या प्रमाणावर तयार करून वाटल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर आता अन्न व औषध प्रशासनाची (FDA) कडक नजर राहणार आहे. सणांच्या काळात होणारी अन्नभेसळ रोखण्यासाठी एफडीए आयुक्त (FDA) तुकाराम मुंढे (Tukaram Munde) वर्षभरासाठी विशेष कृती आराखडा केलाय. प्रत्येक सणासाठी स्वतंत्र आदेश काढण्याऐवजी आता कायमस्वरूपी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ (Standing Orders for All Festivals) हा आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ, गुरुनानक जयंती, वारी, जत्रा आणि उरुस अशा विविध सणांच्या काळात अन्नसुरक्षेची यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने सक्रिय राहणार आहे. सर्व धर्मीयांच्या प्रमुख सणांचा समावेश असलेला वर्षभराचा स्थायी आदेश प्रथमच जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आला आहे.

सरकारी शाळांमध्ये पत्रकार, युट्युबर्सच्या प्रवेशावरील निर्बंध कायम; याचिकेवरील सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार


सणाच्या 21 दिवस आधीपासून FDAची मोहीम

आतापर्यंत सण सुरू झाल्यानंतर तपासणीला सुरुवात केली जात होती. मात्र, नव्या आराखड्यानुसार आता सणाच्या 21 दिवस आधीपासूनच एफडीएची तयारी आणि तपासणी मोहीम सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, सण संपल्यानंतरही ही मोहीम आणखी 30 दिवस राहणार आहे.


पुण्यात DJवरून वाद, नागपुरात थेट बंदी! नांगरे पाटलांचा कडक आदेश; नियम मोडल्यास वाहनेही होणार सील

एफडीएचे कारवाईचे चार टप्पे

पहिला टप्पा : पूर्वतयारी
सणाच्या काळात कोणत्या अन्नपदार्थांची मागणी वाढते आणि त्यापैकी कोणते पदार्थ आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकतात, याचे मॅपिंग केले जाणार आहे. त्यासाठी विशेष पथके नियुक्त केली जातील. तसेच अन्ननमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळांना आधीच सूचना दिल्या जाणार आहेत.

दुसरा टप्पा : पुरवठा साखळीवर लक्ष
अन्नपदार्थ तयार होण्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीवर एफडीएची नजर असेल. गिरण्या, घाऊक बाजारपेठा आणि अन्नपदार्थांची वाहतूक यांची तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर पहाटेच्या वेळेत विशेष नाकाबंदी व नाका तपासणीही केली जाणार आहे.

तिसरा टप्पा : सणाच्या दिवशी धडक कारवाई
महाप्रसाद, लंगर, भंडारे आणि मोठ्या प्रमाणावर अन्नवाटप होणाऱ्या ठिकाणी भरारी पथकांकडून अचानक तपासणी केली जाणार आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक आणि तयार करण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली जाईल.

चौथा टप्पा : थेट कायदेशीर कारवाई
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.


गणेशोत्सवापासून ईद-दिवाळीपर्यंत सणांचे तीन स्तर

एफडीने वर्षभरातील सणांचे त्यांच्या व्याप्ती आणि संभाव्य अन्नसुरक्षा धोक्यानुसार तीन स्तरांमध्ये वर्गीकरण केले आहे.

राज्यव्यापी सण : गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ आणि नववर्ष पूर्वसंध्या.

प्रादेशिक सण : मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी व कार्तिक वारी, श्रावण मास, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंती.

स्थानिक सण : स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरुस.

या वर्गीकरणामुळे सणाचा आवाका, गर्दीचे प्रमाण आणि संभाव्य अन्नविषयक धोका लक्षात घेऊन FDAची पथके तैनात केली जाणार आहेत.

भगर-साबुदाण्यापासून मटण-चिकनपर्यंत तपासणी
सण आणि उत्सवांच्या काळात ज्या अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते, अशा पदार्थांची स्वतंत्र ‘हाय रिस्क फूड’ यादी FDAने तयार केली आहे.

उपवासाच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या भगर, साबुदाणा आणि राजगिरा यांचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. बुरशी लागलेले किंवा खराब झालेले पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत का, यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.

मांसाहारी पदार्थांच्या बाबतीत स्वच्छता, कोल्ड चेन आणि अधिकृत कत्तलखान्यांची वैधता तपासली जाणार आहे. अन्न तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी आणि बर्फ यांची गुणवत्ताही तपासणीच्या कक्षेत असेल. मिठाईच्या बाबतीत खवा, पनीर, तूप, सुकामेवा, खाद्यरंग आणि चांदीचा वर्ख यांची तपासणी केली जाणार आहे.

प्रत्येक सणासाठी एफडीएचा वेगळा ‘फोकस’

प्रत्येक सणाच्या स्वरूपानुसार कोणत्या अन्नपदार्थांवर अधिक लक्ष द्यायचे, याचे नियोजन FDAने केले आहे. अक्षय्य तृतीयेला फळे पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींची तपासणी केली जाणार आहे. नाताळच्या काळात बेकरी उत्पादनांवर, तर रमजान आणि ईदच्या काळात संबंधित खाद्यपदार्थांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. याशिवाय ई-कॉमर्सच्या माध्यमातून विकले जाणारे खाद्यपदार्थ, आयात केलेले अन्नपदार्थ, बेकरी उत्पादने आणि पॅकबंद पाण्याचीही तपासणी केली जाणार आहे.


‘झिरो टॉलरन्स’; भेसळखोरांवर थेट खटला

सणांच्या काळात निकृष्ट किंवा भेसळयुक्त अन्नामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे FDAने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे.

नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरोधात तातडीने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाणार असून, सण संपल्यानंतर 14 दिवसांच्या आत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून दोषींविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांनाही नियम लागू
नव्या स्थायी आदेशामुळे आता प्रत्येक सणाच्या आधी स्वतंत्र मोहीम किंवा आदेश जारी करण्याची गरज राहणार नाही. वर्षभरातील प्रमुख सण-उत्सवांच्या काळात FDAची अन्नसुरक्षा यंत्रणा आधीच नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत राहणार आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करून नागरिकांना किंवा भाविकांना वाटप करणारे महाप्रसाद, लंगर आणि भंडारे यांनाही अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर थेट कारवाई होण्याची शक्यता आहे.

follow us