राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशी सुरुच

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशी सुरुच

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस असून संप सुरुच आहे, त्यामुळे राज्यातली आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईतील 2 हजार डॉक्टरांसह राज्यभरातील 6 हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे ओपीडी आणि ऑपरेशन्सवर मोठा परिणाम झाला आहे.

संपाचा फटका आरोग्य व्यवस्थेला बसतो आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संपामुळे अनेक ऑपरेशन्स पुढे ढकलावी लागली. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु होती. मार्डचे आंदोलन लांबल्यास रुग्णसेवा अधिकच कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा चार दिवसांपूर्वीच दिला होता. मात्र प्रशासनाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, त्यामुळे मार्डने कामबंद आंदोलन सुरु केले आहे. यामुळे रुग्णांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यासह पालिकेच्या मोठ्या रुग्णालयात काल दिवसभर आंदोलन सुरु असताना प्रशासनाने चर्चेसाठी बोलावलं नसल्यामुळे हे आंदोलन सुरूच राहील असं मार्डने म्हटले आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन लवकरच मार्ग काढू असे आश्वासन दिले होते. मात्र, तोडगा काही निघालेला नाही, त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube