नागपूरमध्ये दिवाळीपूर्वीच फुटणार फटाके; RSS च्या बालेकिल्ल्यात होणार ‘इंडिया’चे शक्तिप्रदर्शन

नागपूरमध्ये दिवाळीपूर्वीच फुटणार फटाके; RSS च्या बालेकिल्ल्यात होणार ‘इंडिया’चे शक्तिप्रदर्शन

मुंबई : मोदी सरकार आणि सत्ताधारी भाजपविरोधात एकवटलेली इंडिया आघाडी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन करणार आहे. ऑक्टोबरमध्ये अखेरच्या आठवड्यात किंवा नोव्हेबरच्या पहिल्या आठवड्यात नागपूरमध्ये इंडियाची तिसरी सभा पार पडणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच राज्याच्या उपराजधानीत राजकीय फटाके फुटताना दिसणार आहेत. नवी दिल्लीत काल (12 सप्टेंबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. (The third rally of India will be held in Nagpur in the last week of October or the first week of November)

पहिली सभा भोपाळमध्ये, नागपूरमध्येही होणार शक्तिप्रदर्शन :

इंडिया आघाडीची पहिली एकत्रित जाहीर सभा भोपाळमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर दुसरी पाटण्यात तर तिसरी एकत्रित सभा नागपूरमध्ये होणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमधील सभा झाल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसाच्या अंतराने इतर सभा होणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये अखेरच्या आठवड्यात किंवा नोव्हेबरच्या पहिल्या आठवड्यात नागपूरची सभा पार पडणार आहे.

नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, त्यामुळे हे शहर म्हणजे संघाचा आणि भाजपचा बालेकिल्लाही मानला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून इथे जिल्हा परिषद, विधान परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसने आपली ताकद सिद्ध केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या सभेच्या माध्यमातून काँग्रेस इथे आतापासूनच जोर लावताना दिसून येणार आहे.

1977 नंतर प्रथमच विरोधक एकत्रितपणे प्रचार करणार :

दरम्यान, या जाहीर सभांच्या निमित्ताने 1977 नंतर प्रथमच देशभरातील विरोधक एकत्रितपणे प्रचार करताना दिसणार आहे. 1997 मध्ये तत्कालिन इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येत जनता पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी विरोधकांच्या या एकजुटीला यश येत इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा देशभरातील विरोधक एकवटले असून त्यांनी एकत्रित सभा घेण्याचीही घोषणा केली आहे.

5 वृत्तवाहिन्या आणि 10 निवेदकांवर टाकणार बहिष्कार :

इंडिया आघाडीने कालच्या बैठकीत आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. जे वृत्तनिवेदक द्वेष पसरवतात, एकांगी चर्चा घडवतात त्यांच्या चर्चेच्या कार्यक्रमात इंडियाचे प्रवक्ते पाठवायचे नाहीत, असा ठराव कालच्या बैठकीत झाला आहे. यात 5 वृत्तवाहिन्या आणि 10 वृत्तनिवेदक असल्याची माहिती आहे. त्यापैकी एक दूरदर्शन असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube